...तर सरकारसुद्धा चालू शकत नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. यानिमित्ताने गौरव समितीच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात डॉ. कुकडे यांचा पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

लातूर : चांगली माणसे सोबत घेऊन काम करण्याची निर्णय क्षमता आपल्याकडे नसेल तर संस्था, रुग्णालयच काय सरकारसुद्धा नीट चालू शकत नाही; पण डॉ. अशोक कुकडे यांना चांगल्या माणसांचे बळ मिळाले. त्यामुळे त्यांना आरोग्य सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवता आली, असे गौरवोद्गार माजी राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांनी सोमवारी येथे काढले. तुम्ही ‘त्या’ मंचावर कशाला गेलात, असा प्रश्न आता मला अनेकजण विचारतील; पण आपण चांगल्या कामाच्या पाठीशी राहिले पाहीजे, असेही ते म्हणाले.

आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. यानिमित्ताने गौरव समितीच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात डॉ. कुकडे यांचा पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. डी. लीट मिळाल्याबद्दल डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांनाही या वेळी गौरविण्यात आले. महापौर सुरेश पवार, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक कैलाश शर्मा, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार अमित देशमुख, समाजवादी नेते मनोहर गोमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

चाकूरकर म्हणाले, ‘‘मी न्यायालयात प्रॅक्टीस करण्यासाठी लातूरात आलो, त्याचवेळ डॉ. कुकडे हे पुण्यातून लातूरात आले. पण राजकारणामुळे मला लातूरमध्येच राहता आले नाही. डॉ. कुकडे यांनी मात्र लातूरमध्येच राहून आरोग्यसेवेत मोलाचे योगदान दिले. त्यांचे कार्य लातूरकर कधीही विसरणार नाहीत. आपण सर्व एकाच बिजाची फळे आहोत, हा विचार घेऊन विवेकानंद रूग्णालय वृद्धींगत होत आहे. या कामाची आणि विचाराची दखल घेऊन डॉ. कुकडे यांना पद्मभूषण हा सन्मान मिळाला. हा लातूरकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे.’’

'हा सन्मान लातूरकरांना अर्पण' -
माझी ‘लढे सिपाही, नाम सरदार का’ या म्हणीप्रमाणे स्थिती झाली आहे. वैद्यकीयच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या मदतीने आम्ही सामाजिक, वैद्यकीय कार्य करू शकलो. हा संघटित शक्तीचा एकप्रकारचा प्रयोगच होता. लातूरातील अशा प्रकारच्या सामाजिक निरोगी वातावरणातून आम्ही वैद्यकीय निरोगी वातावरण फुलविण्याचा प्रयत्न केला. त्याची दखल घेऊन जो सन्मान मिळाला तो मी लातूरकरांना अर्पण करत आहे. या सन्मानामुळे उर्जा वाढली आहे. थांबायचं नाही, थकायचं नाही म्हणत हे काम यापुढेही चालूच राहील, अशा भावना डॉ. कुकडे यांनी व्यक्त केल्या.

मी आणि डॉ. कुकडे एका बाकावर बसून शिक्षण घेतले आहे, अशी आठवण सांगून डॉ. संचेती म्हणाले, विचारांची केमिस्ट्री एकसारखी असलेली ज्योत्स्ना आणि अशोक हे दोघे मराठवाड्यात वैद्यकीय सेवेसाठी आले. बघता-बघता दोघांनी लातूरकरांच्या मनात प्रेमाचे, जिव्हाळ्याचे घरटे तयार केले. त्यांचे कार्य अतिशय मोलाचे आहे. देशमुख म्हणाले, राजकारण हे निवडणूकीपुरते असते. त्यानंतर समाजकारण, हे सूत्र लातूरच्या संस्कृतीतच आहे. याची उदाहरणे इथल्या राजकीय इतिहासात, वाटचालीत पाहायला मिळतात. डॉ.कुकडे यांचे कार्य थक्क करणारे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Felicitation of Doctor Ashok Kukade in Latur