esakal | खते, बियाणांचे ३३० नमुने प्रयोगशाळेकडे, अहवालाची प्रतिक्षा...
sakal

बोलून बातमी शोधा

khat

महागडी बियाणे खरेदी करून तसेच त्‍यासाठी मशागत पेरणी आदी खर्च करून पेरणीनंतर न उगवलेल्या बियाणांमुळे शेतकरी अडचणी सापडले आहेत. अनेकांनी न उगवलेल्या पिकावर नांगर फिरवून दुबार पेरणी केली. त्‍यासाठी परत खर्चदेखील करावा लागला. जिल्‍ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीचादेखील पिकांना फटका बसला आहे. 

खते, बियाणांचे ३३० नमुने प्रयोगशाळेकडे, अहवालाची प्रतिक्षा...

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली ः यावर्षी मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, पेरलेले बियाणे उगवले नसल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे. जिल्‍ह्यात भरारी पथकामार्फत खते, बियाणांचे ३३० नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. यामध्ये दोष आढळल्यास संबंधित कंपनीविरुध्द कारवाई केली जाणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. 

जिल्‍ह्यात सहा भरारी पथकामार्फत बियाणाचे व खताचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. जिल्‍ह्यात आतापर्यंत ३३० नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तालुका स्‍तरावर पाच भरारी पथके तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आली आहेत तर जिल्‍हास्‍तरीय पथकासाठी स्‍वतंत्र अधिकारी नेमण्यात आला आहे. आतापर्यंत बियाणांचे २६७ नमुने विविध कृषी केंद्रावरून प्रत्‍येक तालुक्‍यातून घेण्यात आले आहेत. सदरीत नमुने तपासणीसाठी परभणी येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 

हेही वाचा - हिंगोलीला पुन्हा धक्का : आठ जणांना कोरोनाची लागण 

एकाही नमुण्याचा अहवाल प्राप्त झाला नाही

खताच्या विविध कंपनीचे ६७ नमुने आतापर्यंत घेण्यात आले आहेत. हे नमुने अमरावती येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत एकाही नमुण्याचा अहवाल प्राप्त झाला नाही. अहवालात दोष आढळून आल्यास संबंधित कंपनीविरुध्द गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. नमुने घेतल्यानंतरही सदरील बियाणांची व खतांची विक्री थांबविली जात नाही. अहवाल आल्यानंतर त्‍यावर योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. त्‍याला अधिक विलंब लागतो, या वेळेत शेतकरी बियाणे व खते खरेदी करून पेरणीही करतात. त्‍यानंतर अहवालाचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार असा प्रश्न उपस्‍थित केला जात आहे. 

हेही वाचा - मधुमेह, रक्तदाब, हृदयविकाराचा आहे त्रास, मग नोंदणी करणे गरजेचे...

कृषी विभागाकडे अनेक तक्रारी

यावर्षी मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना या नक्षत्रातील पेरणी योग्य असल्याचे मानत पेरण्यांना सुरवात केली. पेरणीनंतर अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीने बियाणे उगवले नसल्याने हे शेतकरी अडचणीत सापडले. या बाबत कृषी विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांसह विविध संघटना, लोकप्रतिनिधी यांनीदेखील सोयाबीन उगवले नसल्याचे तक्रारी केल्या आहेत. यात दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना परत तिसऱ्या वेळेत देखील पेरणीसाठी सज्‍ज व्हावे लागत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत यामुळे भर पडल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

loading image
go to top