पंधराशे शिक्षकांची दर्जावाढ होणार रद्द

सुहास पवळ
शनिवार, 24 डिसेंबर 2016

जिल्ह्यात नियमबाह्य वेतनवाढीमुळे शासनाला प्रतिमहिना ३० लाखांचा भुर्दंड

जिल्ह्यात नियमबाह्य वेतनवाढीमुळे शासनाला प्रतिमहिना ३० लाखांचा भुर्दंड

बीड - आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना समायोजित करण्यासाठी जागा रिक्त नसल्याने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी नियम डावलून शिक्षकांना अडीच वर्षांपूर्वी दर्जावाढ दिली होती. दर्जावाढ म्हणजे वेतनश्रेणीत वाढ नसते किंवा ती पदोन्नतीही नसते, हे माहिती असतानाही दर्जावाढ दिलेल्या शिक्षकांची सरसकट वरिष्ठ वेतनश्रेणी निश्‍चिती केली. यामुळे या सर्व शिक्षकांना प्रतिमाह सरासरी दोन हजार रुपये वाढ गृहीत धरल्यास पंधराशे शिक्षकांमागे जास्तीच्या वेतनापोटी शासनाला प्रतिमाह ३० लाख रुपये इतका तर गेल्या दोन वर्षांत एकूण साडेसात कोटी रुपयांचा भुर्दंड पडल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिक्षकांची दर्जावाढ रद्द करण्यासह जास्तीचे उचललेले वेतनही वसुलीचे आदेश शासनाने दिले आहेत. 

बीड जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या जागा रिक्त नसतानाही अडीच वर्षांपूर्वी आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना सामावून घेण्यात आले. जिल्हाबदलीने आणलेल्या या शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दर्जावाढीचा आधार घेतला. एकूण शिक्षकांच्या २५ टक्के याप्रमाणे जवळपास दीड हजार शिक्षकांना त्यावेळी दर्जावाढ दिली.

दर्जावाढ देताना सेवाज्येष्ठता आणि विषयनिहाय शिक्षक हे निकष पाळणे आवश्‍यक असताना त्याला बगल देत दर्जावाढीची प्रक्रिया राबविण्यात आली. यामुळे एकाच शाळेवर एकाच विषयाच्या अनेक शिक्षकांना नियुक्ती मिळाली. काही ठिकाणी तर आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना थेट दर्जावाढ दिल्याने वेतनश्रेणी वाढीचा लाभही मिळाला. सहशिक्षकांना प्राथमिक पदवीधर म्हणून दर्जावाढ दिली गेल्याने रिक्त झालेल्या सहशिक्षकांच्या जागांवर पुन्हा आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना सामावून घेण्यात आले. या बेकायदा प्रक्रियेनंतर दर्जावाढ मिळालेल्या शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणीची वेतन निश्‍चिती करून घेतली. वास्तविकत: दर्जावाढ म्हणजे सहशिक्षकांना प्राथमिक पदवीधर म्हणून केवळ नियुक्ती मिळते. मात्र, त्यामध्ये वाढीव वेतनश्रेणी देता येत नसतानाही वाढीव वेतनश्रेणी देण्याचा गंभीर प्रकार बिनबोभाट झाला. परिणामी गेल्या अडीच वर्षांपासून दर्जावाढ मिळालेले शिक्षक जास्तीचे वेतन उचलत आहेत. त्यामुळे शासनाला प्रतिमाह ३० लाखांचा आर्थिक भार सहन करावा लागत असून आतापर्यंत तब्बल साडेसात कोटी रुपयांचा भुर्दंड पडला आहे. 

दर्जावाढीतील हा घोटाळा कास्ट्राईबचे राज्य उपाध्यक्ष श्रीराम आघाव यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्याचे अनेक पुरावेही दिले; परंतु याबाबत अधिकाऱ्यांनी कसलीही कारवाई केली नाही. आता मात्र हा प्रकार शासनाच्याच लक्षात आल्याने चुकीच्या पद्धतीने दिलेली दर्जावाढ रद्द करण्याचे आणि त्याद्वारे लाटलेले जास्तीचे वेतन वसूल करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या आदेशानुसार शिक्षण विभागाने पूर्वी दिलेली दर्जावाढ प्रक्रियाच रद्द करण्याची कारवाई सुरू केली आहे. 

अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येत होणार वाढ
दर्जावाढ प्रक्रिया रद्द झाल्यास या शिक्षकांना पुन्हा सहशिक्षकांच्या मूळ जागेवर पाठवावे लागणार आहे. त्यानंतर विषयानुसार आणि पात्र शिक्षकांना नव्याने दर्जावाढ दिली जाणार आहे; परंतु या प्रक्रियेनंतर एकीकडे जिल्ह्यात प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त होणार आहेत, तर दुसरीकडे सहशिक्षकांच्या जागा हाऊसफुल्ल होणार असल्याने अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचाच यात सहभाग राहणार आहे. सदर संभाव्य अतिरिक्त शिक्षकांच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा जिल्हा परिषद प्रशासनासमोर ‘आ-वासून’ उभा ठाकणार आहे. 

जास्तीचे उचललेले वेतन वसूल करा
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दर्जावाढ दिल्याने अपात्र शिक्षकांनीही वरिष्ठ वेतन निश्‍चिती करीत शासनाला कोट्यवधीचा चुना लावला. केवळ चुकीची दर्जावाढच रद्द करण्यात येऊ नये तर जास्तीचे उचललेले वेतनही शिक्षकांकडून वसूल करावे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कास्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीराम आघाव यांनी केली आहे. 

चुकीच्या पद्धतीने दिलेली दर्जावाढ शासनाच्या आदेशाप्रमाणे रद्द करण्यात येणार आहे. ज्या शिक्षकांना दर्जावाढ दिली आहे ती कोणत्या विषयाची आहे? सेवाज्येष्ठता निकषात ते बसतात की नाही? याची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. पात्र विषय शिक्षकांची दर्जावाढ कायम ठेवून इतर शिक्षकांची दर्जावाढ रद्द केली जाऊ शकते. जास्तीचे वेतन वसुलीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील.
- शशीकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग.

Web Title: fifteen hundred teachers will be canceled quality increase