दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवत १५ लाखांची फसवणूक, माजलगाव तालुक्यातील ठोंबरे कुटूंबियांवर गुन्हे दाखल

सुषेन जाधव
Thursday, 17 December 2020

पिग्मी व्यवसायात पैसे गुंतवणूक करुन दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवत ५ महिला आणि २ पुरुष अशा सातजणांची १४ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला.

औरंगाबाद : पिग्मी व्यवसायात पैसे गुंतवणूक करुन दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवत ५ महिला आणि २ पुरुष अशा सातजणांची १४ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना १० फेब्रुवारी ते १५ डिसेंबर दरम्यान घडली. प्रकरणातील संशयित संजय बाळासाहेब ठोंबरे, इंदूबाई संजय ठोंबरे, सचिन संजय ठोंबरे, नितीन संजय ठोंबरे (रा. सर्व दिंद्रूड, ता. माजलगाव, सध्या रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) या कुटूंबिया विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

रेखा भगवान गायकवाड (४८, रा. माजी सैनिक कॉलनी) या सुभाष शेजवळ यांच्या घरात कुटुंबियांसह राहतात. त्यांचे पती सीआरपीएफमध्ये नोकरीला आहेत. आरोपी संजय ठोंबरे हा माजी सैनिक कॉलनीतच काळे यांच्या घरात किरायाने किराणा दुकान चालवित होता. त्यामुळे तीन-चार वर्षांपासून त्याच्याशी ओळख आहे. १० फेब्रुवारी २०१८ रोजी संजय ठोंबरे याने रेखा गायकवाड यांना पैसे दामदुपटीचे आमिष त्याने दाखविले.

त्यानंतर रेखा यांनी विचार करून सांगते म्हणून पुन्हा संजय ठोंबरेची पत्नी इंदूबाई हिला विचारले. तिनेही तसेच आमिष दाखविले. त्यानंतर सुमनबाई घोडके यांच्या समक्ष रेखा यांनी फेब्रुवारीमध्ये दोन लाख १६ हजार रुपये संजय ठोंबरेला दिले. फेब्रुवारी २०२० मध्ये दोन वर्षे कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याला दुप्पट परतावा मागितला असता प्रक्रियेला थोडा वेळ लागतो, असे म्हणून त्याने पुन्हा टाळाटाळ सुरु केली.

 

संशयित झाला गायब
कोरोनाचा मार्च २०२० मध्ये चांगलाच संसर्ग झाला, तसे देशभर लाकडाऊन करण्यात आले. दुकानेही बंद राहू लागली. हे कारण पुढे करत नाहक किराया भरावा लागतो म्हणून संशयित संजय ठोंबरे हा दुकान बंद करून कुटुंबाला घेऊन दिंद्रूडला निघून केला. जाताना त्याने कोणाचेही पैसे परत केले नाहीत असेही फिर्यादीत म्हटले आहे.

कोणाची कितीला फसवणूक?
संशयित संजय ठोंबरे व त्याच्या कुटुंबियांनी रेखा गायकवाड यांची दोन लाख १६ हजार रुपये, शुभम शंकर घोडके (रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) यांची तीन लाख सहा हजार रुपये, नंदा संभाजी गजले (रा. मंबई) यांची दोन लाख १६ हजार रुपये, मथुरा भिका घुगे (रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) यांची दोन लाख १६ हजार रुपये, हमीदा अमाीर खान पठाण (रा. मनिषा नगर, नारायणपूर रोड, वाळूज) यांची दोन लाख १६ हजार रुपये, हरिदास नामदेव पवार (रा. फिरदोस गार्डन, चिनार गार्डनजवळ, पडेगाव) यांची दोन लाख १६ हजार आणि लता वसंत गवंदे (रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) यांची एक लाख ८ हजार रुपये, असे एकूण १४ लाख ९४ हजार रुपयांना फसवणूक केली आहे.

 

सर्वचण गेले संशयिताच्या गावाला
आरोपी संजय ठोंबरे हा पैसे न देताच दिंद्रुडला निघून गेल्यानंतर त्याला वारंवार फोन करूनही तो पैसे देत नव्हता. त्याची टाळाटाळ पाहून फसवणूक झालेले सातही जण पैसे मागण्यासाठी त्याच्या गावी गेले. तेथे संजय ठोंबरे भेटला नाही. परंतु, त्याचा मुलगा नितीन हा त्यांना भेटला. त्याने आल्या मार्गी परत जा, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेत तक्रार दिली होती. आता छावणी ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक पांडुरंग भागिले करीत आहेत.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifteen Lakh Cheating Disclose, Charges Filed On Thombare Family