स्वतःच्या करिअरसाठी पंधरा लाखावर विद्यार्थी सज्ज

प्रमोद चौधरी
शनिवार, 12 जानेवारी 2019

विभागनिहाय आकडेवारी (11 नोव्हेंबरपर्यंतची)
पुणे - दोन लाख 58 हजार 641
नागपूर - एक लाख 54 हजार 823
औरंगाबाद - एक लाख 75 हजार 130
मुंबई - तीन लाख 15 हजार 301
कोल्हापूर - एक लाख 37 हजार 410
अमरावती - एक लाख 59 हजार 738
नाशिक - एक लाख ९४ हजार ६४५
लातुर - एक लाख एक हजार १३३
कोकण - ३३ हजार ३८०
एकूण - १५ लाख ३० हजार २०१

 

नांदेड- अलिकडे सर्वच क्षेत्रांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. शिक्षण क्षेत्रही त्यात मागे नाही. आज करिअरचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही केवळ माहितीच्या अभावामुळे पालक व विद्यार्थी दहावीनंतर काय? अशा द्विधा मनःस्थितीत असतात. त्यासाठी मुलांना दहावीनंतर आवडीचे क्षेत्र निवडता यावे म्हणून राज्यभर कलचाचणीसोबतच अभिक्षमता चाचणी घेतली असून, 11 नोव्हेंबरपर्यंत राज्यात १५ लाख 30 हजार 201 विद्यार्थ्यांनी मोबाईलद्वारे ‘महाकरिअरमित्र अॅप’वरून ही चाचणी यशस्वीपणे दिली.

शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावी. दहावीच्या परीक्षेतील गुणांवरच पुढील दिशा ठरविली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक व अख्खे कुटुंबच चिंतेत असतात. मात्र, माहितीच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी गुणांची टक्केवारी पूर्ण करूनही नैराश्‍य पत्करून जीवन संपवतात. कित्येकदा आवड आणि अभिक्षमता नसणाऱ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतला जातो. खरं तर, प्रत्येक विद्यार्थ्यामधील वेगळेपण शालेय पातळीवरच ओळखणे गरजेचे आहे. परंतु, केवळ गुणांकडेच लक्ष दिले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी 2018-19 या शैक्षणिक वर्षांपासून कल चाचणी बरोबरच, विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखण्यासाठी ‘अभिक्षमता चाचणी’ देखील घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे विद्यार्थ्यांना आवडीचे क्षेत्र, त्यासाठी आवश्यक क्षमता या मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे जाणून घेता येणे शक्य झाले आहे. या चाचणीमुळे महाराष्ट्र राज्य देशात नंबर एक ठरला.

मोबाईलद्वारे झाले सुलभ
‘कलचाचणी व अभिक्षमता चाचणी’ शालेय शिक्षणातील सर्वदूर पोहोचणारा दुवा आहे. उच्च शिक्षणासाठी स्वतःमधील क्षमता ओळखून योग्य ती निवड, जोपासणारा सेतू व करिअर निवडीसाठी  निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.  कलचाचणीत कृषी, कला, वाणिज्य, ललित कला, आरोग्य विज्ञान, तांत्रिक, गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रामधील अभिरुचीचे मापन झाले. - बालासाहेब कच्छवे, विभागीय समन्वयक नांदेड.

राज्यात प्रथमच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीची मोबाईलवरून ‘कल आणि अभिक्षमता चाचणी’ यशस्वी झाली. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सहज व सोप्या रीतीने, इतक्या विद्यार्थ्यांची कोणत्याही अडथळ्याशिवाय 91 % विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिली. यातून विद्यार्थी स्वतःच्या करिअर निवडीबाबत जागरूक झाला असून, 10 वी नंतरच्या अभ्यासक्रम निवडीचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने देखील सिद्ध झाला आहे.- पल्लवी देव, राज्य समन्वयक (कल व अभिक्षमता चाचणी)

Web Title: fifteen lakh student is ready set his career