Vidhan Sabha 2019 : एमआयएमने जाहीर केली पाचवी यादी, यांना मिळाली उमेदवारी

शेखलाल शेख
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

पैठण, बीड, परभणीतील उमेदवारांचा समावेश 

औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे सोमवारी (ता. 30) सहा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी घोषित केलेल्या या यादीत मराठवाड्यातील परभणी, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मतदारसंघाचा समावेश आहे. एमआयएमने आतापर्यंत महाराष्ट्रातील 24 मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले आहेत. 

एमआयएमने राज्यातील पन्नासहून अधिक जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आतापर्यंत पक्षाने निम्म्या म्हणजेच चोवीस मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले आहेत. सोमवारी इम्तियाज जलील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. 
  
पैठणमधून प्रल्हाद राठोड, परभणीतून अली खान 
एमआयएमचा शहरी मतदारसंघात लक्षणीय प्रभाव आहे. परभणीमधून अली खान मोईन खान, बीड - शेख शफिक मोहंमद, पैठण - प्रल्हाद राठोड या मराठवाड्यातील तीन उमेदवारांचा यात समावेश आहे. याशिवाय कामठी नागपूर - शकीबूल रहेमान, हातकणंगले - सागर शिंदे, श्रीरामपूर - सुरेश जगधणे आणि धुळ्यातून डॉ. अन्वर फारूख शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifth list of MIM released