तुळजाभवानी देवस्थानतर्फे पूरग्रस्तांसाठी पन्नास लाख 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी 50 लाख रुपयांची मदत देण्याचा ठराव तुळजाभवानी देवस्थान समितीने मंजूर केला आहे. समितीचे विश्वस्त, आमदार मधुकरराव चव्हाण यांनी रविवारी (ता.11) ही माहिती दिली. 

आमदार चव्हाण यांनी देवस्थान समितीच्या अध्यक्षा, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे पूरग्रस्तांसाठी मदतीचा ठराव घेण्याची मागणी केली होती. मुधोळ-मुंडे यांनी विश्वस्तांच्या संमतीनंतर ठराव मंजूर केला आहे.

25 लाख रुपये मुख्यमंत्री साह्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्‍यक वस्तूंचे एक हजार किट पाठविण्यात येणार आहेत. त्यामध्ये पाच किलो आटा, साखर, चहा यासह विविध वस्तूंचा समावेश असेल. 

उपविभागीय अधिकारी व तुळजाभवानी देवस्थान समितीचे विश्वस्त डॉ. चेतन गिराशे हे स्वतः सर्व वस्तू घेऊन जाणार आहेत. तसेच, आवश्‍यकतेनुसार अजूनही आर्थिक मदत किंवा अन्य मदत केली जाणार आहे. तुळजाभवानी मंदिरात आलेल्या एक हजार शंभर साड्या पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहेत. पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी देवस्थान प्रशासनाने सुरवात केली आहे, असे उपविभागीय अधिकारी डॉ. गिराशे यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty lakh for flood victims