लातूरवर वर्चस्व देशमुखांचे की निलंगेकरांचे?

अरविंद रेड्डी
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

लातूर : मराठवाड्यासह राज्यातील 147 नगरपरिषदांचे पहिल्या टप्यातील निकाल जाहीर झाल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या दुसऱ्या टप्याकडे. 
मराठवाड्यातील लातूर, औरंगाबाद जिल्ह्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. 

लातूर : मराठवाड्यासह राज्यातील 147 नगरपरिषदांचे पहिल्या टप्यातील निकाल जाहीर झाल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या दुसऱ्या टप्याकडे. 
मराठवाड्यातील लातूर, औरंगाबाद जिल्ह्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. 

लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर व अहमदपूर नगरपरिषदेच्या चार नगराध्यक्षपदासाठी 38 तर 101 नगरसेवकांच्या जागांसाठी 501 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात कॉंग्रेस पर्यायाने विलासराव देशमुखांचे चिरंजीव आमदार अमित देशमुखांचे वर्चस्व आहे. दरम्यान राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर संभाजी पाटील निलंगेकरांच्या रूपाने जिल्ह्याला कॅबिनेट व पालकमंत्री पद मिळाले आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकात जिल्ह्यात कोण वर्चस्व गाजवतो याकडे अनेकांचे लक्ष आहे.

नगराध्यक्ष व नगरसेवकपदांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता थेट लढाईला तोंड फुटले आहे. उदगीरला जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या उदगीरमध्ये राजकीय साठमारी आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे बसवराज बागबंदे, कॉंग्रेसचे राजेश्वर निटुरे, राष्ट्रवादीचे समीर शेख, एमआयएमचे ताहेर हुसेन तर, शिवसेनेचे कैलास पाटील यांच्यासह 12 उमेदवार रिंगणात असल्याने येथील लढत चुरशीची होणार आहे. उदगीर जिंकण्यासाठी भाजपने कॉंग्रेसमधून आलेल्या बागबंदे यांना थेट नगराध्यपदाची उमेदवारी दिली आहे. माजी आमदार मनोहर पटवारी यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्यामुळे पालकमंत्री निलंगेकर यांनी रणशिंग फुंकल्याचे स्पष्ट होते.

निलंगेकरांसाठी निलंग्याची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. तिथे नगराध्यक्षपदासाठी भाजपचे श्रीकांत शिंगाडे, कॉंग्रेसचे गोविंद शिंगाडे, शिवसेनेचे सुभाष शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इस्माईल नदाफ यांच्यासह सात तर, नगरसेवकांच्या 20 जागांसाठी 100 उमेदवार रिंगणात आहेत. मंत्रिपद असतानाही परळीत पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाला. तशी आपली अवस्था होऊ नये यासाठी पाटलांनी तयारी सुरू केली आहे. हे करत असतांना पक्षातीलच घरभेदींचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे.
अहमदपूरच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या रजनी रेड्डी, बहुजन विकास आघाडीच्या अश्विनी कासनाळे, राष्ट्रवादीच्या शहनाजबी बागवान, कॉंग्रेसच्या ख्वाजाबेगम शेख तर, शिवसेनेच्या कल्पना रेड्डी यांच्यासह सहा उमेदवार आहेत. नगरसेवकांच्या 23 जागांसाठी 115 उमेदवार मैदानात आहेत. भाजपचा हा एकेकाळचा बालेकिल्ला पुन्हा पक्ष काबीज करणार की अंतर्गत लाथाळ्यांत
 गुरफटणार हा प्रश्न आहे.

औशात नगराध्यक्षपदासाठी भाजपचे किरण उटगे, शिवसेनेचे सुरेश भुरे, कॉंग्रेसचे डॉ. इम्रान पटेल, राष्ट्रवादीचे डॉ. अख्तर शेख आणि कॉंग्रेसचे बंडखोर नेते सुनील मिटकरी यांच्यासह 13 उमेदवार आहेत. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना राजकीय पार्श्वभूमी असल्याने इथे कॉंटे की टक्कर अपेक्षित आहे. नगरसेवकांच्या 20 जागांसाठी इथे 101 उमेदवार असल्याने बहुतांश वॉर्डात बहुरंगी लढती दिसतील.

Web Title: fight between deshmukh and nilangekar in latur