महापालिकेत फाइल पळतात  ‘हातोहात’!

माधव इतबारे
रविवार, 20 जानेवारी 2019

औरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे. आयुक्तांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत अधिकाऱ्यांमार्फत माहिती मागविली आहे.

प्रत्येक विकासकामाची फाइल प्रशासनामार्फत या विभागातून त्या विभागात जाणे गरजेचे असताना नगरसेवक, नगरसेविकांचे पती, दीर व नातेवाईकच महापालिकेत या फाइल ‘चालवीत’ असल्याने त्यांना रोखणार कोण? असा प्रश्‍न यानिमित्ताने कर्मचाऱ्यांमधून केला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लालफितशाही कमी करून कामात पारदर्शकता आणण्याचे शासनस्तरावर प्रयत्न सुरू असले तरी महापालिकेत मात्र ‘हातोहात’ कारभार सुरू आहे. प्रत्येक विकासकामाच्या फाइलचा दुहेरी प्रवास सुरू होतो. वॉर्डातून अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर मुख्यालयात निविदा प्रक्रियेपर्यंत फाइलचा प्रवास होतो. निविदा मंजूर झाल्यानंतर ती पुन्हा वॉर्ड कार्यालयाकडे परतीच्या दिशेने निघते. हा फाइलचा प्रवास मोठा जिकिरीचा असतो. अनेकवेळा या प्रवासात फाइल गहाळ होतात. कर्मचाऱ्यांनी ठेवलेले फाइलचे गठ्ठे कुठे आहेत, याची अधिकाऱ्यांनाही माहिती नसते. या प्रकारामुळे ‘हातोहात’ फाइल चालविण्याचे प्रकार काही वर्षांपासून वाढले आहेत. प्रत्येक नगरसेवक, नगरसेविका किंवा  त्यांचे नातेवाईक वॉर्ड कार्यालयापासून ते मुख्यालयापर्यंत व पुन्हा मुख्यालयापासून ते वॉर्ड कार्यालयापर्यंत स्वतःच फाइल घेऊन फिरतात. खरे तर फाइल म्हणजे सरकारी दस्तऐवज आहे. मात्र कामचुकार अधिकारी-कर्मचारी बिनधास्त या फायली नगरसेवक किंवा त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देऊन मोकळे होतात. त्यातूनच १४ जानेवारीला दोन फाइल गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

आयुक्त म्हणतात, दखल घेणार
फाइल गहाळ प्रकरणाबाबत विचारणा केली असता, मला अद्याप संपूर्ण विषय माहीत नाही; मात्र अधिकाऱ्यांमार्फत माहिती मागविली आहे. यापुढे योग्य ती दखल घेतली जाईल, असे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले. 

महापौर म्हणतात, हे नवीन नाही!
फाइल गहाळ होण्याचा महापालिकेतील प्रकार नवीन नाही. कोणतेही काम तातडीने व्हावे, जनतेची अडचण दूर व्हावी, यासाठी काहीवेळा नगरसेवक स्वतःच फाइल मंजुरीसाठी नेतात. फाइल गहाळ झाली असेल तर ती नव्याने तयार करता येऊ शकते, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

Web Title: File missing from Account section in Municipal Corporation