कचऱ्याचे डोंगर होणार भूईसपाट; आरोग्याचा प्रश्न लागणार मार्गी

सकाळ वृत्तसेवा | Saturday, 6 June 2020

परभणी महापालिकेचे धाररोडवर डंपिंग ग्राऊंड असून वर्षानुवर्षापासून तेथे शहरात दररोज निर्माण होणारा सर्व प्रकारचा कचरा टाकला जातो. त्यामुळे तेथे कचऱ्याचे डोंगर निर्माण झालेले आहेत. परंतू, आता बायोमायनिंगसाठी यंत्र दाखल झाले असून एजन्सीने कामाला सुरवात केली आहे. त्यामुळे धाररोड परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

परभणी : धाररोडवरील महापालिकेच्या डंपिंगग्राऊंडवरील कचऱ्याचे डोंगर लवकरच भूईसपाट होणार असल्याची चिन्हे असून कचऱ्यावर बायोमायनिंग करण्यासाठी सदरील एजन्सीने काम सुरु केले असून यंत्रे दाखल झाली आहेत. खुल्या झालेल्या मैदानावर महापालिका एक चांगला, महत्वाकांशी व नागरिकांच्या हिताचा प्रकल्प राबवू शकते.
महापालिकेचे धाररोडवर डंपिंग ग्राऊंड असून वर्षानुवर्षापासून तेथे शहरात दररोज निर्माण होणारा सर्व प्रकारचा कचरा टाकला जातो. त्यामुळे तेथे कचऱ्याचे डोंगर निर्माण झालेले आहेत. चार-पाच वर्षात वर्गीकृत कचरा संकलनाचे काम जरी सुरु झाले तर या ढिगाऱ्यांमध्ये काही फरक पडलेला नाही. उलट हे डोंगर अधिकच उंच वाढत आहेत. सद्यस्थितीत या परिसरात लोकवस्ती दाट झालेली असून या कचऱ्याची दुर्गंधी सर्वत्र पसरते. तसेच या रस्त्यावरून शहराला अनेक खेडी देखील जोडली गेल्यामुळे तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना देखील या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे हे डंपिंग ग्राऊंड हलवण्याची मागणी अनेक वर्षापासून होती. त्यासाठी आंदोलने देखील झाली. परंतु जागेचा व कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा मार्ग मात्र सोपा नव्हता.

हेही वाचा : जैवतंत्रज्ञानाच्या वापराने पर्यावरण संतुलन राखणे शक्य : डॉ. मित्‍तर
 

 बोरवंड येथे प्रकल्प कार्यान्वित
आता मात्र या कचऱ्याची बायोमायनिंग पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय झालेला असून डपिंग ग्राऊंड बोरवंड येथे हलवले जाणार आहे. बोरवंड येथे देखील कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्प कार्यान्वित झाला असून या कचऱ्याची विल्हेवाट लागल्यानंतर शहरातील सर्व कचरा थेट बोरवंड येथे नेला जाणार आहे.

हेही वाचा : हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत

बायोमायनिंगसाठी पाच कोटीची तरतुद
महापालिकेने आपल्या वार्षिक अंदाजपत्रकात बायोमायनिंगसाठी पाच कोटीची तरतुद केली आहे. तसेच सदरील कामासाठी एजन्सी देखील नियुक्त केली आहे. सदरील एजन्सीने काम सुरु केले असून बायोमायनिंगसाठी यंत्रे व यंत्रणा दाखल होऊ लागली आहेत. पावसाळ्यातच ही कामे सुरु होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेत ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येऊन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाईल. ज्या पदार्थावर प्रक्रिया होते ते पदार्थ वेगळे करून ज्यांच्यावर प्रक्रिया होत नाही, अशा पदार्थाचा उपयोग भर टाकण्यासाठी, खड्डे बुजवण्यासाठी होऊ शकतो.