चित्रपट महोत्सव ही महत्त्वाची शाळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - करिअरला सुरवात करताना आंतरराष्ट्रीय महोत्सव पाहण्याची संधी क्‍वचितच मिळते. अशीच संधी मिळाली आणि त्यातील कलाकारांची भूमिका आणि तो महोत्सव मनात घर करून राहिला. स्पर्धा तसेच धावपळीच्या युगामध्ये चांगला प्रेक्षक हरवत चालला आहे. आपल्याकडे उत्तम प्रेक्षक निर्माण व्हावा, यासाठी सर्वच प्रयत्न करतात. करमणुकीच्या वेगवेगळ्या व्याख्या कळण्यासाठी प्रेक्षक तयार करायला हवे. महोत्सवामुळे चांगला प्रेक्षक निर्माण करता येतो, असे प्रतिपादन ख्यातनाम अभिनेते सचिन खेडेकर यांनी केले.

औरंगाबाद - करिअरला सुरवात करताना आंतरराष्ट्रीय महोत्सव पाहण्याची संधी क्‍वचितच मिळते. अशीच संधी मिळाली आणि त्यातील कलाकारांची भूमिका आणि तो महोत्सव मनात घर करून राहिला. स्पर्धा तसेच धावपळीच्या युगामध्ये चांगला प्रेक्षक हरवत चालला आहे. आपल्याकडे उत्तम प्रेक्षक निर्माण व्हावा, यासाठी सर्वच प्रयत्न करतात. करमणुकीच्या वेगवेगळ्या व्याख्या कळण्यासाठी प्रेक्षक तयार करायला हवे. महोत्सवामुळे चांगला प्रेक्षक निर्माण करता येतो, असे प्रतिपादन ख्यातनाम अभिनेते सचिन खेडेकर यांनी केले.

नाथ ग्रुप व पुणे फिल्म फाउंडेशनतर्फे आयोजित चौथ्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शुक्रवारी (ता.3) प्रोझोन मॉलच्या सत्यम सिनेमागृहात सचिन खेडेकर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, विभागीय आयुक्‍त डॉ.पुरुषोत्तम भापकर, नाथ समूहाचे संचालक नंदकिशोर कागलीवाल, प्रोझोनचे मोहंमद अर्शद, लेखक अजित दळवी, उद्योजक उल्हास गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री.खेडेकर म्हणाले, मी सरावाने नट झालो आहे. काम सुरू केल्यानंतर "नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' व "फिल्म इन्स्टिट्यूट' येथे जाऊन शिकता येईल हे कळण्याआधीच काम करायला लागलो. अभिनयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेता आले नाही, याचे वाईट वाटते.
मराठी प्रेक्षकांची अभिरूची वेगळ्या स्थानावर आणून ठेवण्यात दिग्दर्शकांना यश मिळाले आहे. मल्टीप्लेक्‍सच्या माध्यमातून सिनेमा आपल्याजवळ आला आहे. उत्तम सिनेमा पाहण्याची संधी द्यायला हवी. प्रेक्षकांसाठी "खास शो'चे आयोजन करायला हवे. करमणुकीच्या वेगवेगळ्या व्याख्या कळण्यासाठी प्रेक्षक तयार करायला हवा.

प्रेक्षकांना काही वेगळेपण पाहण्याची चटक लागली तर निश्‍चितच प्रेक्षकांच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते. चित्रपट महोत्सवामुळे मला खूपकाही शिकायला मिळाले. असे महोत्सव म्हणजे एक महत्त्वाची शाळाच असते, असेही खेडेकर म्हणाले.
विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले की, महोत्सव हा सर्वांसाठी पर्वणी ठरणार असतो. आता सिनेसृष्टी पुणे, मुंबईपुरती मर्यादित राहिलेली नाही. विविध भागांतून चांगले कलाकार पुढे येत आहेत.

नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले. श्रद्धा जोशी हिने स्वागत गीत म्हटले. प्रोझोनचे मोहंमद अर्शद यांनी आभार मानले. उद्‌घाटन कार्यक्रमानंतर "पिफ'मध्ये गाजलेला राऊफ हा सिनेमा दाखविण्यात आला. उत्कृष्ट लघुपटाचा गौरव चित्रपट महोत्सावानिमित्त घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेसाठी राज्यभरातून 50 हून अधिक प्रवेशिका आल्या होत्या. यात खाकूब हा किरण चव्हाण दिग्दर्शित लघुपटाने प्रथम पारितोषिक मिळवले. नांदेडच्या योगीसिंग ठाकूर यांचा "संतुलन' हा लघुपटाचा दुसरा क्रमांक आला. तर तृतीय मुंबईचा पुसलेला नंबर हा लघुपट आला आहे. अजित दळवी, अनुया दळवी लघुपटासाठी परीक्षक होते.

समांतर सिनेमाचा अभाव - पटेल
ओम पुरी, नसरुद्दीन शाह, स्मिता पाटील या अभिनेत्यांच्या काळात समांतर सिनेमे झाले. आता तसे सिनेमे होत नाहीत, असे मत डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्‍त केले. दुसऱ्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या उद्‌घाटन समारंभास आलेल्या दिवंगत ओम पुरी यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. कार्यक्रमास आल्यानंतर दोन दिवस ओम पुरी येथे राहिले होते. त्यांच्यात एक पंजाबी रांगडेपणा होता, आवाजात गहिरेपणा होता. तो त्यांच्या अभिनयातूनही दिसून येत होता, असेही त्यांनी सांगितले.

चित्रपट महोत्सव वाढत चालले असून यंदा नागपूरलाही महोत्सव घेण्यात आला. तर 10 फेब्रुवारीला सोलापूर येथेही महोत्सव घेण्यात येणार आहे, असे डॉ.पटेल यांनी सांगितले.

Web Title: Film Festival this important school