
सियाचीन सीमेवर गस्त घालत असताना अचानक गाडी खोल दरीत कोसळून वीरमरण आलेल्या जवान नागनाथ लोभे यांच्या बुधवारी (ता.२३) सायंकाळी निलंगा तालुक्यातील उमरगा (हा) येथे महाराष्ट्र पोलीस व भारतीय लष्कर प्रमुखाच्या वतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
निलंगा (जि.लातूर) : सियाचीन सीमेवर गस्त घालत असताना अचानक गाडी खोल दरीत कोसळून वीरमरण आलेल्या जवान नागनाथ लोभे यांच्या बुधवारी (ता.२३) सायंकाळी निलंगा तालुक्यातील उमरगा (हा) येथे महाराष्ट्र पोलीस व भारतीय लष्कर प्रमुखाच्या वतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील उमरगा ( हा ) येथील भूमिपुत्र जवान नागनाथ अभंग लोभे इंडियन आर्मी इंजिनिअर १०६ मध्ये कार्यरत होता. मागच्या अनेक वर्षांपासून सियाचीन सीमेवर कर्तव्य बजावत होता. ता.२० डिसेंबर रोजी चार जवान एका गाडीतून सीमेवर गस्त घालत होते. अचानक दरड कोसळून त्यांची गाडी खोल दरीमध्ये कोसळून पडल्याने चारही जवानांना जागीच वीरमरण आले.
जवान नागनाथ लोभे यांचे पार्थिव निलंगा येथे आणल्यानंतर निंबाळकर पेट्रोल पंप ते शिवाजी चौक मार्गे उमरगा (हा) पर्यंत शव वाहिनीसमोर मोटारसायकल फेरी काढण्यात आली. प्रथम जवानाचे पार्थिव घरी आणण्यात आले. तदनंतर उमरगा व पण पंचक्राशीतील नागरिकांरिता व निलंगा शहरातील लोकांच्या अंत्यदर्शनासाठी येथील जिल्हा परिषद शाळेत जवानाचे पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी गावकरी जवानाचे पार्थिव गावात आल्यानंतर संपूर्ण गाव शोकाकुल झाले. अनेक युवकांनी शहिद नागनाथ लोभे अमर राहे , भारत माता की जय हो अशा घोषणेने गाव दुमदुमून गेले. सर्वप्रथम माजी सैनिक लातूर जिल्हा संघटनेच्या व निलंगा तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने आजी-माजी सैनिकांच्या वतीने पुष्पचक्र वाहण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय प्रोटोकॉलनुसार प्रथम उमरगा (हा) गावचे सरपंच अमोल बिराजदार, सुभेदार एस.डी.चौघुले, नायब सुभेदार सुपिंदरसिंग, नायक सुरेश कुमार, तहसीलदार गणेश जाधव, जिल्हा सैनिक प्रतिनिधी संजय पवार, उपविभागीय अधिकारी विकास माने, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने हवेत फायरिंग करुन मानवंदना देण्यात आली. जवान नागनाथ लोभे यांच्या पार्थिवाला पुतण्या विष्णू लोभे यांनी मुखाग्नी दिली. शेवटी भारतीय सैन्याच्या वतीने हवेत फायरिंग करत मानवंदना देण्यात आली.
संपादन - गणेश पिटेकर