व्हायरल व्हिडिओने महिलेचा शोध 

मनोज साखरे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

पाच महिन्यांनंतर राज्यस्थानातून सुखरूप आणले घरी 
 

 औरंगाबाद - काही महिन्यांपूर्वी शहरातून बेपत्ता झालेल्या महिलेचा ठावठिकाणा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून मिळाला. ती राजस्थानमध्ये असल्याचे समजताच पोलिसांनी तिची ओळख पटविली. तेथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिच्याशी संपर्क साधून तिला औरंगाबादेत आणले व कुटुंबियांच्या स्वाधीन केले. पाच महिन्यांनंतर तिला पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, बबिता गायकवाड (वय 50, रा. कैलासनगर) असे राजस्थानात सापडलेल्या महिलेचे नाव आहे. पतीचे निधन झाल्यानंतर बबिता या वर्षभरापासून कैलासनगर येथील भावाकडे राहत होत्या. मे महिन्यात बबिता घरातून बेपत्ता झाल्या होत्या. पतीच्या निधनानंतर त्या मानसिकदृष्ट्या थोड्या खचल्या होत्या. नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला; पण उपयोग झाला नाही. जिन्सी पोलिस ठाण्यात त्या बेपत्ता झाल्याबद्दल नोंदही करण्यात आली.

पंधरा दिवसांपासून राजस्थानमधील बासवाडा जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओत एक व्यक्ती बबिता यांना नाव, गाव, नातेवाइकांबाबत विचारपूस करीत असल्याचे दिसून आले. तिने कैलासनगर, औरंगाबाद असा पत्ता सांगून भावाचे नाव सांगितले होते. 

नातेवाइकांकडे केली खात्री 
बेपत्ता झालेल्या बबिता यांच्याबद्दलचा व्हिडिओ जिन्सी पोलिसांकडे आल्यानंतर त्यांनी कैलासनगर येथे जाऊन नातेवाइकांना गाठले. त्यांना व्हिडिओ दाखविला असता त्या बबिताच असल्याचे स्पष्ट झाले. ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ बनवला होता, त्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला व नातेवाइकांचे बोलणे करून दिले. 

कुटुंब गहीवरले 
पोलिसांसोबतच बबिता यांचे जावई व भाचे राजस्थानला गेले. नियोजित पत्त्यावर जात त्यांना सुखरूप परत आणले. पाच महिन्यानंतर त्या घरी आल्याने कुटुंबाचे डोळे आसवांनी डबडबले. त्यांचा शोध घेणाऱ्या पोलिसांना आणि राजस्थानच्या जागरुक नागरिकांनाही बबिता यांच्या कुटुंबियांनी आभार मारले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finding woman with viral video