रावसाहेब दानवेंविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पालिका निवडणुकीदरम्यान पैठण (जि. औरंगाबाद) येथे 17 डिसेंबरला नगराध्यक्षपदाचे उमेदवार सूरज लोळगे व उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत दानवे यांनी "लक्ष्मी दर्शन'संदर्भात वक्तव्य केले होते.

औरंगाबाद - "लक्ष्मी दर्शन'संदर्भात वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पैठणमधील पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

रात्री पावणेबाराला दानवेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भादंवि कलम 171 व महानगरपालिका, नगर पंचायत, नगरपालिका अधिनियम 1968 चे कलम 22 (1) नुसार हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. सहायक पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक गिरी हे तपास करीत आहेत. 

पालिका निवडणुकीदरम्यान पैठण (जि. औरंगाबाद) येथे 17 डिसेंबरला नगराध्यक्षपदाचे उमेदवार सूरज लोळगे व उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत दानवे यांनी "लक्ष्मी दर्शन'संदर्भात वक्तव्य केले होते. या सभेला महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यानंतर दुसऱ्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके व सहायक पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांनी दानवे यांना आचारसंहिता भंगाची नोटीस बजावून जिल्हाधिकारी निधी पांडेय यांच्याकडे सभेत केलेल्या भाषणाचा सविस्तर अहवाल चित्रफितीसह दाखल केला होता.

Web Title: FIR against Maha BJP chief Raosaheb Danve for poll code violation