किराणा दुकानाला आग; साडेतीन लाखांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

सोयगाव : येथील किराणा दुकानाला आज दुपारी आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान भस्मसात झाले. यामध्ये दुकानदाराचे सुमारे तीन लाख साठ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज (गुरुवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास पळसखेडा (ता.सोयगाव) येथे घडली.

सोयगाव : येथील किराणा दुकानाला आज दुपारी आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान भस्मसात झाले. यामध्ये दुकानदाराचे सुमारे तीन लाख साठ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज (गुरुवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास पळसखेडा (ता.सोयगाव) येथे घडली.

मनोज मांगीलाल जैन (रा.पळसखेडा मोगलाईचे ता.सोयगाव) यांचे पळसखेडा येथील ग्रामपंचायत परिसरात गेल्या अनेक वर्षापासून किराणा दुकान आहे. 27 गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मनोज जैन हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन जेवण करण्यासाठी घरी गेले असता दुकानात देवाच्या फोटोसमोर लावलेल्या दिव्यामुळे दुकानातील ज्वलनशील पदार्थांनी पेट घेऊन हे संपूर्ण किराणा दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले.

किराणा दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच मनोज जैन यांनी दुकानाकडे धाव घेऊन गावातील नागरिकांच्या मदतीने दुकानातील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत या भीषण आगीत दुकानातील सुमारे तीन लाख साठ हजार रुपयांचा किराणा माल जळून भस्मसात झाला. मनोज जैन यांच्याकडे या दुकानाव्यतिरिक्त आपली उपजीविका चालविण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नसल्याने त्यांच्या कुटुंबियांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सोयगाव तहसीलचे तलाठी अभिजीत शर्मा यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, नैसर्गिक आपत्ती विभागाला सादर केला आहे. या प्रकरणी शासनाने आपल्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी मनोज जैन यांनी केली आहे.

Web Title: Fire in Grocery Shops Loss of three and a half lakhs