शहरात उभारणार तीन अग्निशामक केंद्रे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

औरंगाबाद - शहराची वाढती लोकसंख्या आणि व्याप लक्षात घेता अग्निशामकची आणखी तीन नवीन केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. शहरात डीमार्ट, सातारा-देवळाई, गारखेडा परिसर, पैठण रोड, शहागंज भागातसुद्धा अग्निशामक केंद्राची आवश्‍यकता असण्यावर जोरदार चर्चा झाली. विषयपत्रिकेत नमूद तीन केंद्रे उभारण्याच्या 2 कोटी 82 लाखांच्या अंदाजपत्रकाला महापालिका सर्वसाधारण सभेने गुरुवारी (ता. 29) दुरुस्तीसह मंजुरी दिली. 

मूळ प्रस्ताव टीव्ही सेंटर, पडेगाव आणि हर्सूल येथे अग्निशामक केंद्रे उभारण्याचा होता. त्यापैकी हर्सूल ऐवजी डीमार्टशेजारची जागा आणि सातारा-देवळाईसुध्दा महापालिका हद्दीतच आले आहे याचा विचार करून योग्य ठिकाणी केंद्र उभारणी करण्याच्या शिफारशी सदस्यांनी केल्या. त्यांचा विचार करून प्रस्ताव दुरुस्तीसह मंजूर करण्याचा आदेश महापौर बापू घडामोडे यांनी दिला. 

प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव चर्चेला आला असता त्यात टीव्ही सेंटर, पडेगाव आणि हर्सूल (रोजाबाग) येथील जागांची निश्‍चिती असल्याचे पाहून माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी म्हणणे मांडले, की डीमार्टजवळील जागा सर्व दृष्टींनी योग्य असल्यास त्याचा विचार करावा, म्हणजे टीव्ही सेंटर आणि रोजाबाग अशा दोन ठिकाणचा खर्च वाचेल. येथील एक केंद्र दुसऱ्या ठिकाणी घेता येईल, असा मुद्दा सदस्य सुरे, नासेर सिद्दीकी यांनी मांडला. राज वानखेडे यांनी डीमार्टजवळची जागा मंजूर करताना नेमकी कोणती जागा आहे हे स्पष्ट करण्याची मागणी केली. या वेळी नंदकुमार घोडेले यांनी सांगितले, की सातारा-देवळाईसोबतच पैठण रोडवरील वीटखेड्याचाही विचार व्हावा. राज्य शासनाकडे जेव्हा मागे ठराव पाठविण्यात आला होता, त्या वेळी पाच अग्निशामक केंद्रे मंजूर झाली होती. मात्र, हा प्रस्ताव नंतर थंड बस्त्यात गेला. पैठण रोडवर यासाठी जागा उपलब्ध आहे. या वेळी नगरसेविका सायरा बानो यांनी शहागंज हा भाग दाट लोकवस्तीचा आहे, येथे व्यापारी मोठ्या प्रमाणात आहेत, त्यासाठी आधीच केंद्र मंजूर आहे, आधी शहागंजात केंद्र बांधा अशी मागणी केली. तेव्हा महापौरांनी प्रस्ताव अंतिम करताना सातारा, गारखेडा, शहागंज व इतर मागण्यांचा साकल्याने विचार करून प्रस्ताव दुरुस्तीसह मंजूर करण्यात आल्याचे जाहीर केले. 

Web Title: Firefighters set up three centers in the city