जिम ट्रेनरवर पिस्तूल रोखले; गोळी झाडल्याचा दावा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

  • शिवाजीनगर येथील प्रकार 
  • जीम ट्रेनरवर झाडली गोळी
  • रात्रीच्या मारहाणीचे सकाळी काढले उट्टे 

औरंगाबाद : मंगळवारी (ता. 9) रात्री झालेल्या किरकोळ मारहाणीचे उट्टे काढण्यासाठी बुधवारी (ता. 10) सकाळी सातच्या सुमारास शिवाजीनगर येथील जीमजवळच ट्रेनरला तिघांनी गाठले. त्याच्यावर गावठी पिस्तुल रोखले. "आपल्यावर गोळीही झाडली. परंतु पिस्तुल लॉक झाल्याने गोळी वर उडून आल्याने वाचलो.'' असा दावा जीम ट्रेनरने केला. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शेख अलीम शेख नवाब (वय 26, रा. गारखेडा) असे जीम ट्रेनरचे नाव आहे. शिवाजीनगर येथील मोरया मंगल कार्यालयाजवळील नयन फिटनेस सेंटर या जीममध्ये ते ट्रेनर आहेत. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शेख अलीमचा नातेवाईक अनीस खान (रा. देवळाई) गारखेड्यातून देवळाईकडे दुचाकीने जात होता. त्यावेळी अनिसला एवढ्या रात्री येथे काय करतो, असे तेथे असलेल्या तिघांनी विचारले. त्यानंतर त्यांनी अनीसला शिवीगाळ व अरेरावी केली. ही बाब अनिसने शेख अलीम यांना फोनवरुन कळविली. त्यानंतर अलीम त्याच्या दोन परिचितांना घेऊन शिवाजीनगर येथे आले. वाद मिटवून सर्वजण आपापल्या घरी गेली. बुधवारी सकाळी अलीम जीममध्ये ट्रेनिंगसाठी गेला. सातच्या सुमारास रात्री मारहाण करणारे संशयित जीमजवळ आले. त्यांनी अलीला जीमबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर अरेरावी करुन त्यातील एकाने गावठी पिस्तुलने फायर केले पण ते लॉक झाल्याने वाचल्याचे ट्रेनरचे म्हणणे आहे. यानंतर घटनास्थळी उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड, पुंडलिकनगर ठाण्याचे प्रभारी घनशाम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. ते संशयितांचा शोध घेत असून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
 

Web Title: firing on gym trainer in aurangabad