प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्याला खंडपीठातही दिलासा नाही 

सुषेन जाधव 
रविवार, 29 जुलै 2018

शेख वसीम अक्रमचे लग्न गुल अफशार यांच्या सोबत झाले. पण पत्नीने या 22 जून ला नांदेडच्या इतवारा पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी पती व सासरकडील मंडळी त्यांचा छळ करत असल्याची तक्रार दिली.

औरंगाबाद - प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शेख वसीम अक्रम यांच्यासह त्यांचे वडील शेख मोहम्मद जलाल यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती मंगेश पाटील यांनी फेटाळला. यापूर्वी नांदेड जिल्हा सत्र न्यायालयातही त्यांना दिलासा मिळालेला नाही. 

शेख वसीम अक्रमचे लग्न गुल अफशार यांच्या सोबत झाले. पण पत्नीने या 22 जून ला नांदेडच्या इतवारा पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी पती व सासरकडील मंडळी त्यांचा छळ करत असल्याची तक्रार दिली. इतवारा पोलीस ठाण्यात तीनही न्यायाधीश शेख वसीम अक्रम, शेख आमेर आणि शेख जावेद सिद्धीकी यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेऊनही शेख वसीम अक्रम, शेख आमेर, शेख मोहम्मद जलाल व अफसारी बेगम शेख मोहम्मद जलाल यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. 

खंडपीठाने सुनावणीअंती शेख आमेर व अफसारी बेगम शेख मोहम्मद जलाल यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला तर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शेख वसीम अक्रम यांच्यासह त्यांचे वडील शेख मोहम्मद जलाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. सरकारी पक्षातर्फे अॅड. ए. आर. काळे यांनी काम पाहिले तर मुळ फिर्यादीतर्फे अॅड. राजेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली.

Web Title: The first division magistrate has no relief in the Division Bench