स्टार्टअप संकल्पनांनी सजले देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

उद्योगजगतात पाऊल ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेल्या संकल्पना आणि त्यांच्या पैलूंवर चर्चा करण्यासाठीची मराठवाडा इनोव्हेशनची पहिली फेरी शनिवारी (ता. 17) सुरू झाली. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय या स्टार्टअप संकल्पनांनी सजले असून, 54 संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. 

औरंगाबाद - उद्योगजगतात पाऊल ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेल्या संकल्पना आणि त्यांच्या पैलूंवर चर्चा करण्यासाठीची मराठवाडा इनोव्हेशनची पहिली फेरी शनिवारी (ता. 17) सुरू झाली. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय या स्टार्टअप संकल्पनांनी सजले असून, 54 संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. 

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठवाडा ऍक्‍सिलरेटर फॉर ग्रोथ ऍण्ड इन्क्‍युबेशन कौन्सिलतर्फे (मॅजिक) आयोजित मराठवाडा इनोव्हेशन चॅलेंज 2019 ला सुरवात झाली. मराठवाड्यातील असलेल्या स्टार्टअप आयडियांसाठी आयोजित या स्पर्धेला देशतील 45 शहरांमधून 267 अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 53 संकल्पनांना या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले. त्यांच्या सादरीकरणाच्या पहिल्या फेरीचे आयोजन शनिवार (ता. 17) आणि रविवारी (ता.18) शहरात करण्यात आले. त्यासाठी पहिल्या दिवशी तीस तर दुसऱ्या दिवशी 23 संघांच्या संकल्पना ऐकून घेतल्या जाणार आहेत. वीस मिनिटांचा कालावधी एका संघाला देण्यात आला असून, त्यातील दहा मिनिटे हे सादरीकरण आणि उर्वरित दहा मिनिटे ही प्रश्नोत्तरांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. रविवारीही सकाळी साडेनऊपासून 23 संघांच्या सादरीकरणाचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सादरीकरण पाहण्यासाठी, स्पर्धकांना प्रश्न विचारता येणार असल्याने उद्योजक होण्याची इच्छा बाळगणारे विद्यार्थी, प्राध्यापक नोकरदार तरुणांनी या स्पर्धेला हजेरी लावण्याचे आवाहन संचालक प्रसाद कोकीळ, आशिष गर्दे, रितेश मिश्रा आदींनी केले आहे. 
 
तज्ज्ञांची समिती, प्रश्नांची सरबत्ती 
या स्पर्धेतील संघांच्या उत्पादनाचे पैलू तपासण्यासाठी विविध तज्ज्ञांची समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती सादरीकरण पाहून संबंधित स्पर्धकाला प्रश्नांची सरबत्ती करतात. यामध्ये उत्पादनाचे टिकाऊपण, बाजारपेठ तयार करण्यासाठी येणारा खर्च, व्यावसायिक दृष्टिकोन आदी विषयांवर तज्ज्ञांनी प्रश्न केले. यामध्ये अभियंते, चार्टर्ड अकाउंटंट, उद्योजक, तांत्रिक विषयांचे माहीतगार लोक निवडण्यात आले आहेत, जे या संकल्पनांच्या पैलूंना तपासत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First round of Marathwada innovation