नळाला मीटर बसवा, अन्यथा पाणीपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

लातूर - महानगरपालिकेने शहरातील नळांना सक्तीने मीटर बसविण्याचे धोरण आखले असून, त्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रशासन सक्तीने मीटर बसवून नळधारकांकडून खर्च वसूल करणार आहे. मीटरचा खर्च न दिल्यास नळाचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लातूर - महानगरपालिकेने शहरातील नळांना सक्तीने मीटर बसविण्याचे धोरण आखले असून, त्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रशासन सक्तीने मीटर बसवून नळधारकांकडून खर्च वसूल करणार आहे. मीटरचा खर्च न दिल्यास नळाचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

यासंदर्भात महापालिका प्रशासनाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शहरातील नागरिकांनी त्यांच्या नळाला २० जानेवारीपर्यंत पालिकेने नमूद केलेल्या दर्जा व गुणवत्तेचे (स्पेशिफिकेशन) मीटर (जलमापके) नोंदणीकृत प्लंबरकडून बसवून घ्यावेत. त्यानंतर ज्यांच्या नळाला वॉटर मीटर बसविलेले नसेल तेथे महापालिकेच्या मंजूर दराप्रमाणे मीटर बसविले जातील आणि त्याचा संपूर्ण खर्च व त्यावरील व्याज संबंधित नळधारकाकडून वसूल केले जाईल. हा खर्च न दिल्यास नळधरकांचा  पाणीपुरवठा बंद केला जाईल, असा इशारा आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे. नळाला मीटर  बसविताना मीटरच्या मागील बाजूस बॉल व्हॉल्व्ह बसविण्यात यावेत, मीटरच्या सुरक्षेसाठी फायबर प्रोटेक्‍शन बॉक्‍स बसवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

महापालिकेने नळाला मीटर बसविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचे स्पेशिफिकेशन दिले जात नाही. कोणत्या कंपनीचे व कोणत्या गुणवत्तेचे मीटर पालिकेला मान्य असेल, हे ठामपणे कुणीच सांगत नाही. त्यासाठी किमान दर्जाचे मॉडेल किंवा सॅम्पल ठेवल्यास लोकांना माहिती मिळू शकेल. पण, त्यासाठी प्रशासन पुढाकार घेत नसल्याने त्यात काहीतरी काळेबेरे दडल्याचा संशय वाढत आहे. शहर किंवा जिल्ह्यात पाण्याचे मीटर उपलब्ध नसल्याने हजारो नागरिकांची अडचण होणार आहे. यातून नागरिकांत गोंधळ निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न आहे.
- अमोल गोवंडे, लातूर

नळाच्या मीटरमध्ये राजकारण करू नका - आमदार देशमुख

लातूर - लातूरकरांच्या सोईसाठी तसेच मूलभूत गरजा पुरविण्यासाठी काँग्रेसने नेहमी प्राधान्य  दिले आहे. शहरात पाणीटंचाई जाणवू नये, दररोज पाणी उपलब्ध व्हावे यासाठी निवडणुकीचा विचार न करता नळाला मीटर बसविण्याचे काम महापालिका करत आहे. नागरिकांना परवडणारे व चांगल्या दर्जाचे मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे विरोधकांनी विरोधासाठी मीटरमध्ये राजकारण करू नये, असे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले.

महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कामाचा प्रारंभ गुरुवारी (ता. २२) रात्री श्री. देशमुख यांच्या हस्ते येथील नंदी स्टॉप येथे करण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर ॲड. दीपक सूळ होते. उपमहापौर चाँदपाशा घावटी, स्थायी समितीचे अध्यक्ष विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त रमेश पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, शहराध्यक्ष मोईज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. 

लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून महापालिकेच्या वतीने विविध कामे करण्यात येत आहेत. सीसीटीव्हीच्या या योजनेवर एक कोटी ९१ लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. हे कॅमेरे बसवल्याने विद्यार्थी, व्यावसायिक, नागरिकांसाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीचे होणार असल्याचे सांगून आमदार देशमुख यांनी शहरात गर्दीच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्याची सूचना केली. शहरात फेब्रुवारीपर्यंत नागरिकांच्या सोईसाठी ३० शहर बस सुरू करण्यात येणार आहेत. इतर योजनाही राबविण्यात येत आहेत. आयुक्त रमेश पवार हे शहराच्या विकासासाठी प्रयत्न करीत असून, त्यांना आमचा पाठिंबा आहे, असे श्री. देशमुख म्हणाले. या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: fit water meter, otherwise water supply close