कीर्ती ऑइल मिलच्या मालकासह पाच जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

लातूर - लातूर अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील कीर्ती ऑइल मिलमध्ये टाकीतील रसायनांचा गाळ काढण्यासाठी आत उतरलेल्या नऊ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणात मिलचे मालक कीर्ती भुतडा, संचालक शिवराम गायकवाड, अंगद गायकवाड, व्यवस्थापक एकनाथ केसरे, तांत्रिक विभागाचा प्रमुख मनोज क्षीरसागर यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. 

लातूर - लातूर अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील कीर्ती ऑइल मिलमध्ये टाकीतील रसायनांचा गाळ काढण्यासाठी आत उतरलेल्या नऊ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणात मिलचे मालक कीर्ती भुतडा, संचालक शिवराम गायकवाड, अंगद गायकवाड, व्यवस्थापक एकनाथ केसरे, तांत्रिक विभागाचा प्रमुख मनोज क्षीरसागर यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. 

अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील कीर्ती ऑइल मिलमध्ये रसायनांचा गाळ काढण्यासाठी चार कंत्राटी कामगार सोमवारी (ता. 30) सायंकाळी टाकीत उतरले. ते वर आलेच नाहीत. त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. कामगार का वर येत नाहीत, हे पाहण्यासाठी गेलेल्या कंपनीच्या पाच कामगारांचाही टाकीतच विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. या घटनेत दगडू श्‍यामराव पवार, बळीराम श्‍यामराव पवार (रा. नागझरी) या दोन सख्ख्या भावांसह नरेंद्र टेकाळे (रा. साखरा), राम येरमे (रा. हरंगूळ), रामेश्वर शिंदे (रा. बोधेगाव, ता. परळी), शिवाजी अतकरे, मारुती गायकवाड (रा. खंडापूर), परमेश्वर बिराजदार (लातूर), आकाश भुसे (रा. गंगापूर) यांचाही मृत्यू झाला. 
टाकीत विषारी वायू तयार झाल्याने मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. काल रात्री दीड वाजता सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. शासकीय रुग्णालयातील सहा डॉक्‍टरांच्या पथकाने मंगळवारी सकाळपर्यंत शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतील जखमी शिवराज पांडुरंग माने (रा. पाखरसांगवी) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. अटक केलेल्या पाचही जणांना दोन फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. 

मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा 
टाकीतील रासायनिक गाळ काढण्याचे काम करण्यास मिलच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले होते. त्यावर वीजप्रवाह सुरू असलेली तार होती. हे माहीत असतानाही टाकीतील गाळ काढण्यास लावला, असे शिवराज पांडुरंग माने यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यावरून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा पाच जणांवर दाखल झाला.

Web Title: five arrested