केवळ नोटा बंद करून असमानता कशी दूर करणार? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - "काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली. मात्र, दुसरीकडे एटीएम, बॅंकांत हवे तेवढे पैसे मिळेनासे झाले. या निर्णयाचा सर्वाधिक फटका सामान्यांना बसला असून, दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना तीन दिवसांपासून सहा-सहा तास रांगेत उभे राहावे लागत आहे. केवळ नोटा बंद करून देशातील असमानता कशी दूर करणार? काळा पैसा हा केवळ नोटांमध्ये नसून तो सोने, जमिनी आणि विदेशी चलन यांत आहे. त्यामुळे गरिबांच्या खात्यात 15 लाख जमा करणार होतात की या खात्यातील पैसे दुसरीकडे पाठविणार होतात?' असा सवाल ख्यातनाम पत्रकार पी. साईनाथ यांनी उपस्थित केला. 

अनंत भालेराव स्मृती पुरस्कार यंदा पी. साईनाथ यांना रविवारी (ता. 13) मधुकरराव मुळे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यानंतर आयोजित "संकट में ग्रामीण भारत' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. ते म्हणाले, की आज प्रत्येकजण खर्च करण्यापुरते का होईना, पैसे शोधत आहे. मीदेखील शहरातील शहागंजसह चिकलठाणा व अन्य एका ठिकाणी एमटीएम, बॅंकेत गेलो होतो. मात्र, तेथे पैसेच नसल्याने लोकांचे खूप हाल होत असल्याचे दिसून आले. येत्या तीन दिवसांत ही परिस्थिती न सुधारल्यास कायदा व सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. सरकारने प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करू, असे आश्‍वासन दिले; मात्र 15 लाख सोडा, साधे 15 रुपयेदेखील जमा झालेले नाहीत. पनामा घोटाळ्याचे काय झाले, विजय मल्ल्या 10 हजार कोटी रुपये बुडवून लंडनमध्ये पसार झाला, हे काय सुरू आहे? 

गेल्या 15 वर्षांत आर्थिक असमानता मोठ्या प्रमाणात वाढली, ही लाजिरवाणी बाब आहे. देशातील 15 लोकांकडे जेवढा पैसा आहे, तेवढा देशातील अर्ध्या जनतेकडे नाही. देशातील शेतकऱ्यांना महिन्याकाठी 6,426 रुपये मिळतात अशी अवस्था आहे. त्यामुळे लोकशाही धोक्‍यात येत आहे. राज्यात ग्रामीणच्या तुलनेत शहरात 400 % अधिक पाणी मिळते. हा घोटाळाच आहे. येथील 6 बीअर आणि 6 अल्कोहोल बनविणाऱ्या कंपन्यांना 4 पैसे प्रतिलिटर भावाने पाणी देता, दुसरीकडे लोकांना पिण्यासाठी पाणी 10 रुपये लिटरने घ्यावे लागते, ही असमानता नाही का, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. 

डॉ. सविता पानट यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठान स्थापनेचे हे पंचविसावे वर्ष असल्याने यानिमित्ताने पुरस्काराची रक्कम पंचवीस हजार रुपयांवरून पन्नास हजार केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी अशोक भालेराव, निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ, प्रतापराव बोराडे, डॉ. प्रभाकर पानट, श्‍याम देशपांडे, सुभाषचंद्र वाघोलीकर, सुनीता धारवाडकर उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत उमरीकर यांनी केले.

Web Title: Five hundred & thosuand rupees notes to impose a ban on the removal of black money