साडेपाच लाखांवर शेतकरी किसान सन्मान निधीच्या प्रतीक्षेत

साडेपाच लाखांवर शेतकरी किसान सन्मान निधीच्या प्रतीक्षेत

बीड - केंद्र सरकारने मागील अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आणि नव्या सरकार स्थापनेनंतर या योजनेत सुधारणा केल्यानंतर जिल्ह्यातील सहा लाख ८९ हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, तीन टप्प्यांत दोन हजारांप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये मिळणाऱ्या योजनेतील पहिल्या टप्प्याचे दोन हजार रुपये केवळ एक लाख ३० हजार शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पाच लाख ५९ हजार शेतकरी पहिल्या टप्प्याच्या प्रतीक्षेत आहेत.

माहिती अपलोडचे काम केवळ ३६ टक्के
योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांचा शेती खातेउतारा, सात-अ/१२, बॅंक खाते क्रमांक आदी माहिती ग्रामपंचायत आणि महसूल विभागाकडून एकत्र करून ती संबंधित योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली जात आहे. नव्या घोषणेत बहुभूधारक शेतकऱ्यांचाही या योजनेत समावेश केला आहे. त्यामुळे आठ लाख १० हजार ८९७ पैकी सहा लाख ८९ हजार २६२ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. यातील आतापर्यंत दोन लाख ५२ हजार १७७ शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली आहे. झालेले काम एकूण कामाच्या केवळ ३६.५९ टक्के एवढेच आहे. त्यातही ५० हजार शेतकऱ्यांची माहिती रद्द केली गेली असून, २९ हजार शेतकऱ्यांची माहिती चुकीची भरल्याचे समोर आले आहे.

फेब्रुवारीत झालेल्या अर्थसंकल्पावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर केली. यात वर्षाकाठी तीन टप्प्यांत शेतकऱ्यांना सहा हजारांची मदत दिली जाणार आहे. 

मात्र, दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर या योजनेत बदल करून सर्वच (बहुभूधारक) शेतकऱ्यांचाही (नोकरदार, आमदार, खासदार, जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य वगळून) या योजनेत समावेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील आठ लाख १० हजार ८९७ पैकी सहा लाख ८९ हजार २६२ शेतकरी पात्र ठरले. मात्र, आतापर्यंत केवळ एक लाख ३० हजार शेतकऱ्यांनाच पहिल्या टप्प्यातील दोन हजारांची रक्कम खात्यात जमा झाली आहे. आणखीही पाच लाख ५९ हजार शेतकऱ्यांना लाभाची प्रतीक्षा आहे. 

तालुकानिहाय अपेक्षित लाभार्थी शेतकरी
तालुका         लाभार्थी शेतकरी
बीड               ९७ हजार ९४६
गेवराई             ९५ हजार ९४५
शिरूर             ४२ हजार ५२४
अंबाजोगाई        ५५ हजार ५५४०
केज                ६८ हजार ८८७
माजलगाव          ५५ हजार ६७६
वडवणी             २८ हजार ८९४
धारूर              ३६ हजार ७००
पाटोदा              ५० हजार ७१३
आष्टी               ९३ हजार ७८१
परळी               ५७ हजार ६५९
एकूण     सहा लाख ८९ हजार २६२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com