कुटुंबातील पाचजणांचा आत्मदहनाचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

औरंगाबाद - खोट्या गुन्ह्यात गोवून सिडको पोलिस त्रास देत असल्याचा आरोप करीत मिसारवाडी येथील एका कुटुंबातील पाचजणांनी पोलिस आयुक्तालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. रॉकेल अंगावर ओतल्यानंतर त्यांना पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी मोठी धावाधाव होऊन गदारोळ माजला. ही घटना सोमवारी (ता. 20) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. 

औरंगाबाद - खोट्या गुन्ह्यात गोवून सिडको पोलिस त्रास देत असल्याचा आरोप करीत मिसारवाडी येथील एका कुटुंबातील पाचजणांनी पोलिस आयुक्तालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. रॉकेल अंगावर ओतल्यानंतर त्यांना पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी मोठी धावाधाव होऊन गदारोळ माजला. ही घटना सोमवारी (ता. 20) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. 

याबाबत माहिती अशी की, रवींद्र गंगाधर ढेपे (रा. मिसारवाडी) याच्यासह आकाश नामक तरुणावर महिलेला धमकी दिल्याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणात ढेपेला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. पण चौकशीसाठी न जाता ढेपे यांनी पोलिस महासंचालक व पोलिस आयुक्त यांना पत्र पाठवून पोलिस त्रास देत असल्याचा आरोप केला. या पत्रात सोमवारी (ता. 20) सकाळी साडेअकराला कुटुंबासहित आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सोमवारी सकाळपासून आयुक्तालयाच्या गेटवर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. साडेअकरा दरम्यान ढेपे कुटुंबीय आयुक्तालयात पोचले. त्यावेळी रवींद्रला ओळखणाऱ्या पोलिसाने त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचे दोन्ही भाऊ व आई-वडिलांनी गोंधळ घातला. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी रॉकेलची कॅन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्ञानेश्वर ढेपे याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी रवींद्र, त्याचे वडील गंगाधर, आई, भाऊ ज्ञानेश्वर व अभिनंदन तसेच मित्र आकाश मोरे व फिरोज यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून माचिस काढून घेण्यात आल्या. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर, सी. डी. शेवगण, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, अनिल आडे यांनी ढेपे कुटुंबीयांची समजूत काढली व त्यांना बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ढेपे कुटुंबीयासह एकूण सातजणांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. 

सूडभावनेतून खोटा गुन्हा 
एका व्यक्तीवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराची आपण पोलिस आयुक्तांकडे व्हॉटसऍपद्वारे तक्रार केली होती. त्यामुळे सूडभावनेने संबंधितांनी माझ्यावर खोटा गुन्हा नोंद केला. त्यावेळच्या घटनेदरम्यानचे माझे टॉवर लोकेशन घेऊन सत्याची पडताळणी करावी, अशी मागणीही ढेपे याने निवेदनाद्वारे पोलिस आयुक्त, महासंचालकांना केली. 

Web Title: five people trying to self-combustion