तीर्थपुरीत विद्युत तार तुटल्याने पाच दुकाने जळून खाक (व्हिडीओ)

तुकाराम शिंदे
बुधवार, 10 एप्रिल 2019

या आगीत पाच दुकानाचे जवळपास बारा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. आग विजवण्यासाठी खासगी टँकर चालकांनी व गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

तीर्थपुरी (जि. जालना) : तीर्थपुरी येथे बुधवारी (ता. 10) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास येथील बसस्थानक परिसरातील विद्युत तार तुटल्याने पाच दुकानांना आग लागली. या आगीत चार दुकाना जळून खाक झाल्या असून एका दुकानाचे नुकसान झाले आहे. या आगीत या व्यापाऱ्यांचे दुष्काळात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.        

येथील कुंभार पिंपळगाव रस्त्यावरील नवीन बसस्थानक परिसरात रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात विविध व्यावसायिकांच्या दुकाना आहेत. या दुकानारून विजेची तार गेली असून सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास विजेची तार तुटून हकीम शेख यांच्या जीलानी गादी घर या दुकानावर पडली. दुकानात मोठ्या प्रमाणात कापूस व इतर साहित्य असल्याने दुकानाने पेट घेतला. त्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने लगत असलेल्या शेख नसीर शेख मुसा, संतोष पवार, शेख सत्तार यांच्या दुकानाने पेट घेतला. तर गजानन पंडित याच्या दुकानाचे नुकसान झाले. या दुकानाला लाकडी फळ्या व तीन पत्राच्या होत्या. या आगीत हकीम शेख यांच्या गादी घराचे अंदाजे सहा लाख रुपये, शेख नसीर (फर्निचर दुकान) दोन लाख, संतोष पवार (मोटार रिवायडिंग) दीड लाख रुपयांचे, शेख सत्तार शेख युसुब (मोटार रिवायडिंग) यांचे दोन लाख रुपयांचे व गजानन पंडित यांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे या व्यवसायिकांनी सांगितले.

या आगीत पाच दुकानाचे जवळपास बारा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. आग विजवण्यासाठी खासगी टँकर चालकांनी व गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. एक ते दीड तासानंतर ही आग आटोक्यात आली. याठिकाणी फर्निचरचे दुकान व गादी घरामध्ये कापसाचा रुई व विद्युत मोटार, पंप व इतर साहित्य जळाले. यातील चार दुकाने जळून खाक झाली असून दुकानदाराचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

घटनास्थळाला वीज वितरण कंपनीचे अधिकारी व शाखा अभियंता व्यकटेश परसे यांनी भेट देऊन पंचनामा केला. दुष्काळी परिस्थिती असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. त्यातच दुकानाला आग लागल्याने या व्यवसायाचे मोठे नुकसान झाल्याने व्यापाऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे. हे व्यापारी छोटे असल्याने याचे या व्यवसायावर कुटूंबाचा उदरनिर्वाह होता.

सदरील घटना विद्युत मंडळांच्या गलथान कारभारामुळे झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Five shops burnt in massive fire 12 lakh damages in jalna

टॅग्स