झेंडूच्या फुलांतून कमाईची आस 

वालसावंगी (ता. भोकरदन) : परिसरात शेतात बहरलेली झेंडूची फुले. 
वालसावंगी (ता. भोकरदन) : परिसरात शेतात बहरलेली झेंडूची फुले. 

वालसावंगी (जि. जालना) - नवरात्रोत्सवानिमित्त शेवंती, गुलाब, तर विजयादशमीसाठी झेंडू फुलांना असणारी मागणी लक्षात घेत अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळले. पारंपरिक पिकांना रोगराईचा फटका बसल्याने अनेकांना आता विजयादशमीनिमित्त झेंडूच्या फुलांतून दोन पैसे कमाविण्याची आशा आहे. परिसरात सोमवारपासून (ता. सात) फुलांच्या तोडणीला वेग येणार आहे. 

भोकरदन तालुक्‍यातील वालसावंगी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर फुलशेतीकडे वळले आहे. यात प्राधान्याने शेवंती, झेंडू, गुलाब यांसह अनेक फुल उत्पादने शेतकरी घेत आहेत. गेल्यावर्षीच्या दुष्काळाची मरगळ हटवत यंदा मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. फुलांची राखलेली योग्य निगा, केलेली मशागत यामुळे फुलशेती बहरली आहे. यंदा गणेशोत्सवात जळगाव, बुलडाणा, भुसावळ येथील बाजारपेठांमध्ये झेंडूला 60 ते 70 रुपये किलोपर्यंत भाव मिळाला होता. सध्या नवरात्रोत्सवानिमित्ताने बाजारपेठेत झेंडूच्या फुलांना 20 ते 40 रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विजयादशमीला भाव मिळेल या अपेक्षेने फुलांची विक्री; तसेच तोडणी थांबवली. परिणामी सध्या शेतशिवार विविध प्रकारच्या फुलांमुळे रंगीबेरंगी झाले आहे. परिसरात सोमवारी शेतातील फुलांची तोडणी सुरू होईल. विजयादशमीनिमित्त शेतकरी गावातूनच फुलांची भरलेली वाहने भुसावळ, बुलडाणा, औरंगाबाद, जळगाव येथे पाठविण्याचे नियोजन करीत आहेत. तर काही शेतकरी गावातच फुलांची विक्री करण्याच्या तयारीत आहेत. एकंदरीत झेंडूच्या फुलांना 100 रुपये किलोपर्यंत भाव मिळावा, अशी अपेक्षा उत्पादक शेतकरी करीत आहेत. 

अपार परिश्रमाने झेंडूची शेती फुलवली आहे. फुलशेती बहरात आहे. दसऱ्याला भाव चांगला मिळावा ही आशा आहे. ग्राहकांनी देखील रास्त रक्कम देऊन फुलांची खरेदी करावी. विक्री न झालेली फुले फेकून देण्यावाचून पर्याय राहत नाही. 
- दिनेश फुसे, शेतकरी 
----- 
वालसावंगी परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतकरी फुलशेती करतात. ही फुले अन्य बाजारपेठांत विक्री करावी लागतात. वाहतुकीचा खर्च सहन करावा लागतो, वेळही त्यात जातो. त्यामुळे फुलांची स्थानिक बाजारपेठ होणे गरजेचे आहे. येथे बाजारपेठ उपलब्ध झाल्यास ठिकठिकाणचे व्यापारी येतील, फुलांची जागेवर विक्री होईल, याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. 
- नारायण गवळी, शेतकरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com