उद्यानातील झाडाझुडपांसह फुलांचे सौंदर्य बहरले

उद्यानातील झाडाझुडपांसह फुलांचे सौंदर्य बहरले


पैठण (जि.औरंगाबाद ) : दुष्काळाचा चटका सहन कराव्या लागणाऱ्या पैठण येथील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यानाला जायकवाडी धरण भरताच बहर आला आहे. पाण्याअभावी कोमेजून गेलेल्या उद्यानातील झाडाझुडपांसह फुलांचे सौंदर्य बहरले असून, पाटातून झुळूझुळू वाहणारे पाणी आणि मराठी, हिंदी चित्रपटांच्या गीतांवर नृत्य करणाऱ्या संगीत कारंज्यांचा आनंद आता पर्यटकांना मुक्तपणे लुटता येणार आहे. उद्यानातील पाणी व्यवस्थापन धरण निर्मिती करतानाच करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण उद्यानाला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जात असून, या पाण्यावरच उद्यान अवलंबून आहे.

परंतु गेल्या दोन वर्षांच्या काळात अनेक महिने उद्यान पाण्याअभावी उदास झाले होते. यामुळे पर्यटकांचाही हिरमोड झाला होता. धरण मृत पाणीसाठ्यात गेल्याने उद्यानाचा पाणीपुरवठा विस्कळित होऊन शेवटी शेवटी बंद पडला. त्यामुळे उद्यान पाण्याअभावी बंद असल्याचा फलक उद्यान व्यवस्थापनाने लावला व उद्यानाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी पर्यटकांना सूचित करून उद्यान प्रवेशच बंद केला होता. परंतु आता उद्यानाचे भयाण दिसणारे चित्र नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे बदलले आहे. धरणात क्षमतेनुसार मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे उद्यानात पाण्याची पुरेपूर व्यवस्था झाली असल्याने पाण्यावाचून सुकून गेलेली बाग आता फुलून गेली आहे.

पाण्यामुळे कायम टिकणार उद्यानाचे सौंदर्य!
धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यामुळे उद्यानाची पाणी समस्येची चिंता दूर झाली आहे. या उपलब्ध पाणीसाठ्यातून कायमस्वरूपी पाणी उद्यानासाठी मिळणार आहे. यामुळे उद्यानाचे निसर्गसौंदर्य कायम टिकून राहणार असून, पर्यटकांनाही या सौंदर्याचा आनंद लुटता येणार आहे. तसेच पर्यटकांची गर्दी वाढणार असल्यामुळे उद्यानाच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com