चारा-पाण्यासाठीची परवड यंदा थांबली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

औरंगाबाद - मराठवाड्याने गेल्या वर्षी दुष्काळाच्या तीव्र झळा सोसल्या. पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा आणि पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला होता. त्यामुळे काही जिल्ह्यांतील जनावरांचे छावण्यांत स्थलांतर करावे लागले होते. गेल्या वर्षी अखेरच्या टप्प्यात झालेल्या चांगल्या पावसाने यंदा मात्र असे चित्र कुठेही नाही, ही शेतकऱ्यांना सुखावणारी बाब ठरली आहे. यंदाचा उन्हाळा तीव्र असला तरी जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध आहे. त्यामुळे छावणीचा प्रश्‍नच आलेला नाही आणि तशी मागणीही झाली नसल्याची बाब तुलनात्मक आढावा घेतल्यावर पुढे आली. यंदा पाऊस वेळेवर न झाल्यास मात्र काही गावांत चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

नांदेड पट्ट्यात पुरेसा चारा
नांदेड - नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात गेल्या वर्षी अखेरच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध आहे. कोणत्याही भागातून जनावरांचे स्थलांतर झालेले नाही, अशी सद्यःस्थिती आहे. यंदा वेळेवर पाऊस झाला नाही तर काही भागात चारा टंचाई निर्माण होऊ शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
हिंगोली जिल्ह्यात लहान-मोठी जवळपास तीन लाख जनावरे आहेत. यंदा रब्बी हंगामात हरभरा, तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. तुरीच्या चूरचा चारा म्हणून वापर केला जात आहे. या जिल्ह्यात जूनपर्यंत चारा टंचाईची शक्‍यता नाही.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात गेल्या वर्षी चारा टंचाई होती पण छावणी नव्हती. परभणी जिल्ह्याने प्रस्ताव पाठविला होता मात्र चारा छावणी मंजूर झाली नव्हती. एका ठिकाणी विश्व हिंदू परिषदेतर्फे खासगी स्वरूपात चारा छावणी सुरू करण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यात सध्या काही गावांना टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. मात्र त्या ठिकाणी अद्याप चारा टंचाई नाही. तिन्हीही जिल्ह्यात जनावरांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झालेला नाही. दरम्यान, औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांतही अशीच स्थिती आहे.

- गेल्या वर्षी बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत "छावणीराज'
- अखेरच्या टप्प्यातील पावसाने यंदा चारा, पाणी उपलब्ध
- छावण्यांचा प्रश्‍नच नाही, मागणीही नाही
- वेळेवर पाऊस न झाल्यास काही ठिकाणी चाऱ्याचा प्रश्‍न शक्‍य

Web Title: fodder water this year stop