औरंगाबादेत मदरशातील 67 मुलींना विषबाधा 

औरंगाबादेत मदरशातील 67 मुलींना विषबाधा 

औरंगाबाद - दावतनंतर 67 मुलींना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी (ता. 26) पडेगाव येथील कासंबरी दर्गा परिसरातील मदशात घडली. या सर्वांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तज्ज्ञांमार्फत उपचार सुरू आहेत. यातील दोघींची प्रकृती गंभीर असून, अन्य मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनी सांगितले. 

पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गाजवळ "राबिया बसरीया लील बनात' हा मुलींची मदरसा आहे.

येथील 70 मुलींना मंगळवारी सिल्लेखाना येथील सलमान कुरेशी यांच्याकडे संध्याकाळची दावत होती. साडेसातच्या सुमारास मुलींनी बिर्याणीचे भोजन केले. त्यानंतर एका टेंपोतून मुलींना मदरशात नेण्यात आले. दरम्यान, काही मुलींना उलट्या आणि मळमळ सुरू झाली. मदरशात पोहोचल्यानंतर बहुतांश मुलींची प्रकृती खालावली. या वेळी परिसरातील नागरिकांनी जमेल तसे त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मास कॅज्युल्टीची माहिती मिळाल्याने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित रोकडे, डॉ. सरफराज यांच्यासह घाटी प्रशासनाने काही रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पाठविल्या. 

बालरोग विभागाच्या वॉर्ड क्रमांक 24 मध्ये 31, तर आपत्कालीन लिथोट्रीप्सी कक्षात 36 मुलींना दाखल करण्यात आले. बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रतिभा खैरे, डॉ. अमोल सूर्यवंशी, डॉ. समाधान प्रदीप, डॉ. सय्यद, डॉ. उबेर, डॉ. अमीर, डॉ. अंजू, डॉ. निला, डॉ. कुमेश, डॉ. अश्विनी, डॉ. नीलेश आणि वॉर्ड इन्चार्ज रजनी कुलकर्णी यांच्यासह कर्मचारी मुलींची शुश्रूषा करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. कैलास झिने, उपअधीक्षक डॉ. विकास राठोड, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार इम्तियाज जलील, आमदार अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण यांच्यासह लोकप्रतिनिधी, नातेवाईक यांनी रुग्णालयात धाव घेतली. 

गर्दी झाल्याने पोलिसांचे दंगा काबू पथकास पाचारण करण्यात आले. स्टेबल मुलींना काही काळाने सुटी देण्यात येणार आहे. तर काही मुलींना उपचारार्थ रुग्णालयातच ठेवावे लागेल, असे डॉ. सुक्रे यांनी सांगितले. दरम्यान, याकामी के. के. ग्रुपचे किशोर वाघमारे, हाफीस साहब, सोहेल यांच्या मित्रमंडळाने मोठे परिश्रम घेतले. 

नागरिकांचा आरोप 
कासंबरी दर्गा भागातील रफिक कुरेशी यांनी मदरशा प्रशासनाने ही घटना दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला; तसेच मुलींना एकाच टेंपोतून कोंबून नेल्याने त्यांच्या जिवाशी खेळल्याचेही ते म्हणाले. तर मदरशा प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. 

वॉर्डात प्रचंड गर्दी 
67 मुलींना एकाच वेळी दाखल झाल्याने वॉर्डात नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. परिणामी कर्मचारी व नातेवाईक मुलींना पुठ्ठ्याने हवा घालत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com