किसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन 

राजेभाऊ मोगल
मंगळवार, 19 मार्च 2019

शेतकऱ्यांचे प्रश्‍न लावून धरण्यासोबतच शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्‍त करण्यासाठी किसानपुत्रांनी मंगळवारी (ता.19) 'अन्नदात्यांसाठी एक दिवस अन्नत्याग' आंदोलन सुरु केले आहे. 

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सतत आंदोलन करूनही सरकारला जाग आलेली नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी अद्यापही ठोस उपाय योजना सुरवात झालेली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकल्या नाहीत. हा प्रश्‍न लावून धरण्यासोबतच शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्‍त करण्यासाठी किसानपुत्रांनी मंगळवारी (ता.19) 'अन्नदात्यांसाठी एक दिवस अन्नत्याग' आंदोलन सुरु केले आहे. 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या आवारात सकाळी अकरा वाजता या उपोषणास सुरवात झाली. सायंकाळी 4 वाजता या उपोषणाची सांगता होईल. यात डॉ. राजेश करपे, डॉ. राम चव्हाण, प्रा. श्रीराम जाधव, श्रीकांत उमरीकर, नितीन देशमुख, राजु शेरे यांच्यासह मोठ्या संख्येनी शेतकरीपुत्र सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत जाचक कायदे असून यात बदल होणे, अपेक्षित आहे; मात्र तसे न होता शेतकऱ्यांचे प्रश्‍न बिकट होत आहेत. त्यामुळे अमर हबीब यांच्या किसानपुत्र आंदोलनाने अनोखे आंदोलन पुकारले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील चिल गव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने 19 मार्च 1986 रोजी सहकुटुंब आत्महत्या केली होती. आजपर्यंत देशात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अद्यापही शेतकऱ्यांचे प्रश्‍न कायम असल्याने शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्‍त करण्यासाठी राज्यभर किसानपुत्र आंदोलनाने अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. 

याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्हानिहाय व्हॉटसऍप ग्रुप तयार करण्यात आले. आंदोलनात किती शेतकरी सहभागी होतील, याबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण करण्यात आली. सोशल मिडीयावरही या आंदोलनाची जोरदार चर्चा झालेली आहे. अनेकजण आपण यात सहभागी होत आहोत, असे सांगत तुम्ही? असा प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या चळवळीने व्यापक स्वरुप घेतले आहे.

Web Title: Food sacrifice agitation of farmers sons in aurangabad