हर्सूल कारागृहातून फुटेज, हार्डडिस्क जप्त

हर्सूल कारागृहातून फुटेज, हार्डडिस्क जप्त

औरंगाबाद - योगेश राठोड यांच्या मृत्युप्रकरणी हर्सूल कारागृहात शहर पोलिस; तसेच कारागृह उपमहानिरीक्षक यांच्याकडून स्वतंत्र पातळीवर चौकशी; तसेच तपाससत्र सुरू करण्यात आले आहे. घटनेवेळी उपस्थितांचे जबाब उपमहानिरीक्षकांतर्फे घेतले जात आहेत. शहर पोलिसांनीही जबाब घेत हार्डडिस्क जप्त केली असून, सीसीटीव्ही फुटेजचे सॉर्टिंग केले जात आहे.

हर्सूल ठाणे पोलिसांनी कारागृहात घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर घटनास्थळी जबाबही घेत चौकशी केली. दरम्यान, डीव्हीआर जप्त करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजचे सॉर्टिंग केले जात आहे. याबाबत उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले, की महासंचालकांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार दिवसभर चौकशी करीत आहोत. क्रमांक एकच्या बराकीत ३० ते ३५ आरोपी होते; तसेच ड्युटीवरील पोलिसही होते. १७ जानेवारीला सायंकाळी ड्युटीवर येऊन १८ जानेवारीला सकाळी गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. यात कैदी, डॉक्‍टर, प्रवेशद्वारावरील कर्मचारी, चालक यांचे जबाबही घेणे सुरू आहे. उत्तरीय तपासणी अहवाल व आरोप यावरून आम्ही चौकशी करीत आहोत. कारागृहात कोणत्याही प्रकारचा मृत्यू ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कैद्यांमध्ये भांडण झाल्यास सौम्य बळाचा वापर करता येऊ शकतो; पण अन्य कारणांनी कैद्यांना मारहाण करता येत नाही. कारागृहातील मृत्यू ही बाब वरिष्ठ पातळीवरही अतिशय गांभीर्याने घेतली जाते. वैद्यकीय अहवाल व एफआयआर आम्हाला प्राप्त झाला नाही. कारागृहाच्या रचनेनुसार आवश्‍यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. ते बसविण्याचे काम सर्व कारागृहात सुरू असल्याचे ते म्हणाले. 

तपास जाणार ‘सीआयडी’कडे
पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक भागिले तपास करीत आहे. हार्डडिस्कसह अन्य काही बाबी पोलिसांनी जप्त केल्या. हा तपास ‘सीआयडी’कडे येत्या दोन दिवसांत वर्ग होण्याची चिन्हे आहेत.

म्हणे फीट आली...
कारागृहात फीट आल्याने उपचारासाठी दाखल केल्यानंतर मृत्यू झाल्याचा कांगावा कारागृहातील त्या वेळी उपस्थित जबाबदारांनी केले आहे; परंतु फीट आल्यानंतर शरीरावर जखमा होत नाहीत. अथवा व्रणही नसतात. मृताचे दोन्ही तळहात, दोन्ही गुडघे, चेहरा तसेच पाठीवर माराच्या जखमा आहेत हे विशेष.

दारू मागितल्याने मारहाण?
सूत्रांच्या माहितीनुसार, योगेश मद्यसेवन करीत होता. याबाबत कारागृह उपमहानिरीक्षकांनीही तो व्यसनी असल्याची बाब समोर आल्याचे सांगितले. कारागृहात आल्यानंतर त्याला मद्य हवे होते. यातून वाद उत्पन्न होऊन त्याला कारागृहात मारहाण केली गेली त्यात डोक्‍याला अंतर्गत दुखापत झाल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com