वन विभागाने केला वृक्षतोडीचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

आंबेवाडी (ता. गंगापूर) धरणाच्या भिंतीवरील झाडांची कत्तल केल्याप्रकरणी अखेर वन विभागाने शुक्रवारी (ता. 30) उपजिल्हाधिकारी संदीपान सानप यांच्या सूचनेवरून पंचनामा केला व वन विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला. वन विभागाचे अधिकारी सोमनाथ आमले यांच्या तोंडी आदेशावरून वनरक्षक कविता राऊत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

गंगापूर, ता. 31 (जि.औरंगाबाद) : आंबेवाडी (ता. गंगापूर) धरणाच्या भिंतीवरील झाडांची कत्तल केल्याप्रकरणी अखेर वन विभागाने शुक्रवारी (ता. 30) उपजिल्हाधिकारी संदीपान सानप यांच्या सूचनेवरून पंचनामा केला व वन विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला. वन विभागाचे अधिकारी सोमनाथ आमले यांच्या तोंडी आदेशावरून वनरक्षक कविता राऊत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संपर्कप्रमुख किशोर पवार यांच्यासमक्ष ही कारवाई करण्यात आली. याविषयी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वन विभागाकडून तपास सुरू आहे. महसूल विभागामार्फत तलाठी बी. आर. नारळे यांनीही पंचनामा केला आहे. मात्र, महसूल विभागाने अद्याप पोलिसांकडे गुन्हा दाखल केलेला नाही.

 

आजुबाजूच्या शेतकऱ्यांची संदिग्ध भूमिका

आंबेवाडी (ता. गंगापूर) शिवारातील धरणाच्या भिंतीवरील 39 झाडांची अवैधरीत्या बुधवारी (ता. 28) कत्तल करण्यात आली. किशोर पवार यांनी वेळीच धाव घेऊन वृक्षतोड रोखून महसूल प्रशासनाला कळविले. त्यानंतर वृक्षतोड करणारी टोळी पसार झाली. शेजारी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी याबाबत संदिग्ध भूमिका घेतली. दरम्यान, किशोर पवार यांनी सांगितले, ""आम्ही याच धरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अडीच हजार झाडांची लागवड केली. याच ठिकाणी दुसऱ्या बाजूने मोठमोठी झाडे तोडण्यात येत असल्याचे समजले. तेथे जाऊन वृक्षतोड थांबवली. आता दोषींवर कठोर करवाई व्हावी.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forest Department File Crime In Trees Cutting