वन विभागाने लावलेली झाडे शंभर टक्के जीवंत

विकास गाढवे
शुक्रवार, 13 जुलै 2018

लागवड केलेल्या वृक्षाचे निष्ठेने संगोपन करत ती शंभर टक्के जगवली आहेत. यातूनच लातूर तालुक्यातील एकुरगा वनक्षेत्रातील वीस हजार झाडे चार वर्षानंतर तर ढाकणी वनक्षेत्रातील चाळीस हजार झाडे तीन वर्षानंतर शंभर टक्के जीवंत आहेत.

लातूर : सरकारी योजनेत लावलेली झाडे शंभर टक्के जीवंत राहत नाहीत. वृक्ष लागवड करतानाही ते गृहित धरले जात नाही. 70 ते 80 टक्के झाडे जीवंत राहतील, असा सरकारी अंदाज असतो. मात्र, हाच सरकारी अंदाज वन विभागाने चुकीचा ठरवला आहे.

लागवड केलेल्या वृक्षाचे निष्ठेने संगोपन करत ती शंभर टक्के जगवली आहेत. यातूनच लातूर तालुक्यातील एकुरगा वनक्षेत्रातील वीस हजार झाडे चार वर्षानंतर तर ढाकणी वनक्षेत्रातील चाळीस हजार झाडे तीन वर्षानंतर शंभर टक्के जीवंत आहेत. दोन्ही वनक्षेत्राला गुरूवारी (ता. 12) भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.   

वनक्षेत्राचे प्रमाण वाढवण्यासाठी वन विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मागील काही वर्षात वृक्ष लागवडीसोबत त्यांच्या जोपासनेलाही महत्व दिले जात आहे. लावलेली सर्व झाडे जीवंत ठेवण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी विविध प्रयोग करत आहेत.

एकुरगा व ढाकणी वनक्षेत्रात लावलेली वृक्ष शंभर टक्के जीवंत ठेवण्यासाठी प्रयोग करण्यात आला. दोन्ही वनक्षेत्रात लिंब, चिंच, वड, पिंपळ, बांबू, सिताफळ आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. ढाकणी येथील वनक्षेत्रात 2015 च्या पावसाळ्यात 19 हजार 992 वृक्षांची लागवड केल्यानंतर जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागला.

विंधनविहिर खोदून पाणी उपलब्ध केले व वृक्ष जीवंत ठेवली. यासोबत जलशोषक चर खोदून पावसाचे पाणी जाग्यावर मुरवून त्याचा फायदा वृक्षांना करून दिला. गुरे प्रतिबंधक चर खोदून रासायनिक खताची मात्रा वेळोवेळी दिली. याच पद्धतीने 2016 च्या पावसाळ्यात ढाकणी वनक्षेत्रात लागवड केलेल्या चाळीस हजार वृक्षांचे संगोपन करण्यात आले होते. यामुळे दोन्ही वनक्षेत्रातील लावलेली शंभर टक्के वृक्ष जीवंत राहिले आहेत. 

गुरूवारी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दोन्ही वनक्षेत्राला भेट देऊन वन विभागाच्या कामाचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या व परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी राजेश गुप्ता यांच्या हस्ते शिराळा (ता. लातूर) येथील वनक्षेत्रात तेरा कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण केले.

यावेळी सहाय्यक वनसंरक्षक आर. जी. मुद्दमवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जी. पोतुलवार, वनपरिमंडळ अधिकारी एन. एस. पचरंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Forest Department planted one hundred percent tree are live