फेसबुकवरून जवानाची आर्थिक फसवणूक, चाळीस हजार खात्यावर पाठविले

Cheat Through Facebook Account, Chakur News
Cheat Through Facebook Account, Chakur News

चाकूर (जि.लातूर) : मुलगा आयसीयूमध्ये असून पैशाची गरज असल्याचा मेसेज एका बीएसएफ जवानाला आला. त्यांनी कोणताही विचार न करता तातडीने रात्री दहा वाजता चाळीस हजार रुपये खात्यावर पाठविले. जवानाने दाखविलेली ही सहानुभूती त्यांना पश्चात्ताप करण्यास भाग पाडली असून अज्ञात व्यक्तीकडून फसवणूक झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात द्यावी लागली आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात वीरेंद्रसिंग नफेसिंग हे कार्यरत असून त्यांचे नातेवाईक दीपक संगवान याच्या फेसबुक अकाउंटवरून सोमवारी (ता.२५) रात्री दहाच्या सुमारास मेसेज आला.

माझा मुलगा आयसीयूमध्ये असल्यामुळे त्याच्या उपचारासाठी दहा हजार रुपयांची गरज आहे. सकाळी अकरा वाजता मी पैसे परत करतो. पैसे पाठविण्यासाठी त्याने मोबाईल क्रमांकही दिला. यामुळे वीरेंद्रसिंग यांनी सुरवातीला दहा हजार रुपये पाठविले. काही वेळानंतर पुन्हा मेसेज आला व आणखी पैशाची मागणी केली. यामुळे त्यांनी मित्राकडून घेऊन तीस हजार रुपये पाठविले. यानंतर वीरेंद्रसिंग यांनी दीपक संगवान याला फोन करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मागील चार दिवसांपासून माझे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे.

त्यामुळे ते वापरतच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चाकूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक जयवंतराव चव्हाण यांची भेट घेऊन हकीकत सांगितली. मुलगा आयसीयूमध्ये आहे म्हणून मी सहानुभूतीपूर्वक विचार केला व त्यांच्या मदतीसाठी तातडीने पैसे पाठविले. परंतु त्याने माझी फसवणूक केली असल्याची तक्रार दिल्यावरून अज्ञात व्यक्तीने फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण करीत आहेत.

खात्री न करता पैसे पाठवू नका
फेसबुकच्या माध्यमातून भावनात्मक मेसेज पाठवू फसवणूक केली जात आहे. असे मेसेज आले तर त्या व्यक्तीस फोन करून खात्री करून घ्या. त्याला समोर बोलावून घेऊन त्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीस आपला बँक खाते क्रमांक, एटीएम पिन सांगू नका, असे पोलिस निरीक्षक जयवंतराव चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com