अबब..या जिल्ह्यात चाळीस हजार पदवीधर मतदार

कृष्णा जोमेगावकर
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

नांदेड - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नांदेड जिल्ह्यातील चाळीस हजार पात्र पदवीधर मतदारांनी ता. सहा नोव्‍हेंबरपर्यंत नुमना फॉर्म नं १८ मध्‍ये विहीत नमुन्‍यात अर्ज सादर केले आहेत. पहिल्या टप्यात अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नसल्याने यापुढे पुरवणी यादीत पदवीधारांची नोंदणी वाढण्याची शक्यता निवडणुक विभागाने व्यक्त केली आहे.
 

नांदेड - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नांदेड जिल्ह्यातील चाळीस हजार पात्र पदवीधर मतदारांनी ता. सहा नोव्‍हेंबरपर्यंत नुमना फॉर्म नं १८ मध्‍ये विहीत नमुन्‍यात अर्ज सादर केले आहेत. पहिल्या टप्यात अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नसल्याने यापुढे पुरवणी यादीत पदवीधारांची नोंदणी वाढण्याची शक्यता निवडणुक विभागाने व्यक्त केली आहे.
 
मतदार नोंदणी नियम १९६० अंतर्गत नियम ३१ (३) अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रम ता. एक ऑक्टोबरपासून जाहीर झाला होता. मतदार नोंदणीसाठी एक ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत पात्र पदवी अहर्ता, पात्र तत्सम अर्हता व्यक्तींना नमुना नं.१८ मध्ये मतदार नोंदणीसाठी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे तसेच उपजिल्हा निवडणुक अधिकारी प्रशांत शेळके यांनी केले हाेते.

अर्जाचा नमुना तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विनामुल्य उपलब्ध होता. या नोंदणीसाठी एक नोव्हेंबर २०१९ या अर्हता दिनांकापूर्वी किमान तीन वर्ष अगोदर पात्र पदवी अर्हता अथवा तत्सम पात्र पदविका इ. धारण करणाऱ्या व्यक्तींनी अर्ज केले. नमुना १८ च्या अर्जासह मूळ कागदपत्रे अथवा राजपत्रित अधिकाऱ्याकडून सांक्षांकित केलेल्या सत्यप्रती सोबत जोडणे आवश्यक होते. अर्जदार ज्या ठिकाणी अर्ज करेल त्या ठिकाणचा सामान्यत: रहिवासी असावा. अर्जासोबत पदवी, पदविका परीक्षेचे अंतिम गुणपत्रक देखील ग्राह्य धरले होते. मात्र, गुणपत्रकान्वये सदर व्यक्ती पास किंवा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणित असणे आवश्‍यक होते.

जिल्ह्यात ४० हजार अर्ज दाखल
जिल्ह्यातील पदवीधरांनी पहिल्या टप्यात मुळयादीत ता. सहा नोव्हेंबरपर्यंत ४१ हजार ३५३ अर्ज दाखल केले आहेत. यातील ३९ हजार ७१७ अर्ज पात्र ठरले आहेत. तर एक हजार एकशे पाच अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात ४० हजार ८२२ अर्ज मिळाल्याची माहिती उपजिल्हा निवडणुक अधिकारी कार्यालयातून मिळाली. यानंतर पुरवणी यादीसाठी नाव नोंदणी होणार आहे. यात पदवीधरांना अर्ज दाखल करता येईल. यावेळी अपेक्षीत नोंदणी झाली नसल्यामुळे पुरवणी अर्ज नोंदणीदरम्यान पदवीधरांची वाढ होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. मागील वेळी २०१३ मध्ये जिल्ह्यात ४३ हजार २९३ अर्ज दाखल झाले होते. यात पुरुष ३७ हजार ८३० तर महिला पाच हजार ४६३ अर्जदारांचा समावेश होता.
----


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forty thousand graduated voters in this district