माजलगावात चार कोटींचा अपहार, तीन मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेत तीन मुख्याधिकारी व चार लेखापालांनी पद व अधिकारांचा दुरुपयोग करून शासकीय अभिलेखामध्ये बनावट नोंदी घेतल्या. नगरपालिकेस विविध विकास कामासाठी आलेल्या चार कोटी 13 लाख रुपयांचा हा अपहार आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

माजलगाव (जि. बीड) - येथील नगरपालिकेस विविध विकास कामासाठी आलेल्या चार कोटी 13 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी बी. सी. गावित, लक्ष्मण राठोड व मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्यासह सात जणांवर शहर पोलिसांत मंगळवारी (ता. 24) पहाटे तीनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

याबाबत माहिती अशी की, शहराच्या विविध विकास कामासाठी माजलगाव नगरपालिकेत 11 मे 2016 ते 27 मार्च 2019 या कालावधीत विविध योजनेअंतर्गत कोट्यवधींचा निधी आला होता; परंतु पालिकेतील तत्कालीन मुख्याधिकारी बी. सी. गावित, लक्ष्मण राठोड व मुख्याधिकारी हरिकल्याण जनार्दन येलगट्टे यांच्यासह तत्कालीन लेखापाल अशोक भीमराव कुलकर्णी (वांगीकर), अंगद लिंबाजी हजारे, सूर्यकांत ज्ञानोबा सूर्यवंशी, कैलास रांजवण या सात जणांनी पद व अधिकारांचा दुरुपयोग करून शासकीय अभिलेखामध्ये बनावट नोंदी घेतल्या.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

तीन लाखांपेक्षा अधिक रकमेच्या कामाची ई-निविदा कार्यप्रणाली राबवणे बंधनकारक असताना तसे न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासकीय रक्कम चार कोटी 13 लाख 57 हजार 912 रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी पहाटे नगरपालिकेचे स्थापत्य अभियंता कृष्णा श्रीराम जोगदंड यांनी दिली.

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

या प्रकरणी वरील तीन मुख्याधिकाऱ्यांसह चार लेखापालांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक सय्यद सुलेमान हे तपास करत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्याधिकारी गावित यांच्यावर एक कोटी 44 लाख अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four crore rupees misconduct in Majalgaon

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: