महापौर, ऊर्जामंत्री भाजपाचे तरीही शहरातील रस्त्यांवर दाटला अंधार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - महापालिकेकडे वीजबिल थकले म्हणून, महावितरण कंपनीने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. मोकाट कुत्रे अंधाराचा फायदा घेऊन रस्त्याने जाणाऱ्यांच्या अंगावर धावून जात आहेत, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासन म्हणते, सध्या पैसे नाहीत. शासनाकडून एलबीटीचे अनुदान आल्यावर वीजबिलातील अंशत: रक्‍कम भरू तर महावितरणचे बिल भरणा केल्याशिवाय वीजपुरवठा नाही, असे साचेबद्ध उत्तर आहे. शहराचे महापौर भाजपचे, राज्याचे ऊर्जामंत्री देखील भाजपाचेच चंद्रशेखर बावनकुळे आहेत.

औरंगाबाद - महापालिकेकडे वीजबिल थकले म्हणून, महावितरण कंपनीने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. मोकाट कुत्रे अंधाराचा फायदा घेऊन रस्त्याने जाणाऱ्यांच्या अंगावर धावून जात आहेत, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासन म्हणते, सध्या पैसे नाहीत. शासनाकडून एलबीटीचे अनुदान आल्यावर वीजबिलातील अंशत: रक्‍कम भरू तर महावितरणचे बिल भरणा केल्याशिवाय वीजपुरवठा नाही, असे साचेबद्ध उत्तर आहे. शहराचे महापौर भाजपचे, राज्याचे ऊर्जामंत्री देखील भाजपाचेच चंद्रशेखर बावनकुळे आहेत. मात्र चार दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर अंधार कायम आहे. 

पथदिव्यांचे वीजबिल थकल्याने महावितरणने शुक्रवारी (ता. तीन) सायंकाळी पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला असून, सोमवारी (ता.सहा) त्याला चार दिवस झाले. अद्याप शहरातील रस्ते अंधारात आहेत. कॉंग्रेसतर्फे रविवारी (ता. पाच) आयुक्‍तांच्या निवासस्थानापुढे गॅसबत्त्या पेटवून लटकवल्या. रस्त्याने अंधार असल्याने सायंकाळनंतर नागरिकांना फिरणे कठीण झाले आहे. अंधाराच्या भीतीने पालकांनी आपल्या पाल्यांना सायंकाळच्या क्‍लासला पाठवणे बंद केले आहे. अंधारामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. महापालिका आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी सोमवारी (ता.सहा) पत्रकारांना सांगितले की, पथदिव्यांचे बिल भरण्यासाठी आता पैसे नाहीत. 25 कोटी आजच द्या, म्हणाल तर ते शक्‍य नाही. शासनाकडून एलबीटीचे 14 कोटी रुपयांचे अनुदान येणे बाकी आहे जर ते ही रक्कम दोन दिवसांत आली तर काही रक्‍कम भरू. अंधारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बिल कधीतरी भरावेच लागणार आहे, यासाठी वीजपुरवठा सुरू करावा, असे पत्र महावितरणला दिले आहे. या पत्राची प्रत पोलिस आयुक्‍तांनाही दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू - महापौर 
महापौर भगवान घडामोडे म्हणाले, पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरू करण्यासंदर्भात सोमवारी (ता.सहा) महापालिका, महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शासनाकडून एलबीटीचे महापालिकेला 27 कोटी येणे बाकी आहे. तर पथदिव्यांच्या वीजबिलाचे 25 कोटी देणे आहे. त्यामुळे त्यांनी एलबीटीतून पैसे वळते करून दोन कोटी रुपये महापालिकेला द्यायला पाहिजे. वीजबिल थकले म्हणून जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. अंधारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर याला महावितरण जबाबदार राहील. पथदिवे सुरू झाले नाही तर मंगळवारी (ता.सात) मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत.

Web Title: Four days off streetlight