आजपासून चार दिवस ठणठणाट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे नागरिक गेल्या काही महिन्यांपासून त्रस्त आहेत. उन्हाळा संपला तरी हाल संपलेले नाहीत.

औरंगाबाद -  शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळित असताना आता विद्युत व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी (ता. २८) तब्बल १२ तासांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे १२ तास शहरात पाण्याचा एक थेंबही येणार नाही. परिणामी, एका दिवसाने पाणीपुरवठा उशिराने होणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले असले तरी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान चार दिवस लागू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे नागरिक गेल्या काही महिन्यांपासून त्रस्त आहेत. उन्हाळा संपला तरी हाल संपलेले नाहीत. अनेक भागांत अद्याप पाच-सहा दिवसांनंतर नळाला पाणी येत आहे. त्यामुळे आंदोलनांचे सत्र सुरू आहे. पाणीटंचाईला वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा हे कारण असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी विद्युततारांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे वीज कंपनीने जायकवाडी व फारोळा येथील रिंग मेन युनिटची जोडणी करण्यासाठी महापालिकेकडे शटडाऊनची मागणी  केली होती. त्यानुसार शुक्रवारी तब्बल १२ तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. हे काम झाल्यानंतर महापालिकेच्या पाणी उपसा पंपांना अविरत वीज मिळेल, असा दावा केला जात आहे. 

शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपूर्ण पंप बंद केले जाणार असून, रात्री आठ वाजता पंप सुरू केले जातील; मात्र शहरात पाणी येण्यासाठी रात्री अकरा ते १२ वाजू शकतात. शुक्रवारी ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता त्या भागात आता शनिवारी पाणीपुरवठा होईल. पुढील पाण्याचे वेळापत्रक एक दिवस पुढे जाईल; मात्र संपूर्ण पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्यासाठी किमान चार दिवस लागण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मागितले आठ तास, घेतले १२ तास 
वीज वितरण कंपनी व महापालिकेत पाणीपुरवठ्यावरून नेहमीच वाद होतो. पाच-दहा मिनिटे लाईट गेली तरी महापालिका वीज वितरण कंपनीमुळे पाणीपुरवठा विस्कळित झाला, असे जाहीर करून मोकळी होते, असा आक्षेप आहे. दरम्यान, आठ तासांचे शटडाऊन मागितले असताना महापालिकेने १२ तास केले. आमचे काम आठ तासांच्या आत संपणार असल्याचे कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. शटडाऊनच्या काळात महापालिकादेखील अत्यावश्‍यक कामे करणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four days from today no water in aurangabad