मंठा-परतूर धरणासमोरील नदीपात्रात प्रकल्पग्रस्तांकडून चार तास ठिय्या आंदोलन

मंठा-परतूर धरणासमोरील नदीपात्रात प्रकल्पग्रस्तांकडून चार तास ठिय्या आंदोलन

मंठा :  दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने पिण्याचे पाणी देण्यास आमचा विरोध नाही, परंतु नदीपात्रात पाणी सोडून मंठा-परतूर-सेलू-घनसावंगी तालुक्‍यातील जनतेची तहान भागविणाऱ्या निम्न दुधना धरणातील पाण्याची नासाडी करू नये, या मागणीसाठी मंठा-परतूर तालुक्यातील काही पक्षांचे नेते, शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी (ता. 8) केदार वाकडी येथे धरणासमोरील नदीपात्रात चार तास ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनात माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, गोपाळराव बोराडे, डाॅ. प्रदीप चव्हाण, कपिल अकात, अन्वर देशमुख, भाऊसाहेब गोरे ,पंकज बोराडे, गणेश बोराडे, सिद्धेश्वर काकडे, नितीन जेथलिया, राजेंद्र खरात, शिवाजी महाराज भोसले आदींनी उपस्थित शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन केले.

यावेळी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया म्हणाले, पिण्याचे पाणी देण्यास आमचा विरोध नाही. यापूर्वी तीनवेळा प्रकल्पातील पाणी सोडून नदीपात्रातील खड्ड्यात पाणी वाया गेले असून, आता पाण्याची तीव्र टंचाई असल्याने पिण्याकरिता पाणी  देण्यास आमचा विरोध नाही. पाण्याची नासाडी होऊ नये, म्हणून टँकरने पुरवावे तसेच प्रकल्पग्रस्तांनी लाखो रुपयांचे कर्ज घेऊन शेतात पाइपलाइन करून ऊस व बागायती पिके घेतली आहेत. त्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करून त्यांच्या पिकाचे नुकसान करू नये व नदीपात्रात पाणी सोडणार नाही, असे शासनाच्या वतीने लेखी आश्वासन द्यावे. अन्यथा सोमवार ( ता. 13 ) पासून तालुक्यातील प्रकल्पग्रस्त व शेतकरी केदार वाकडी येथील धरणासमोर नदीपात्रात ठिय्या आंदोलन करतील असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.

गोपाळ बोराडे म्हणाले, हे आंदोलन म्हणजे जगण्याचा अट्टाहास, संघर्ष आहे. राजकीय फायद्यासाठी नदीपात्रात पाणी सोडून मंठा परतूर तालुक्यातील शेतकऱ्याचे नुकसान करू नका. तसेच भाऊसाहेब गोरे म्हणाले, जनतेच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वी शासनाने निर्णय घेऊन नदीपात्रात पाणी सोडणार नाही, असे लेखी आश्वासन द्यावे.

यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून परतूरचे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, सेलूचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पाटील यांना निवेदन देऊन प्रकल्पग्रस्त शेतकरी व मंठा परतूर तालुक्यातील नागरिकांच्या भावना शासनाला कळविण्याचे सुचविण्यात आले. यावेळी मंठाचे तहसीलदार सुमन मोरे, परतूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम,सेलूचे तहसीलदार बालाजी शेवाळे, शाखा अभियंता सतिश बगले तसेच उपनगराध्यक्ष सिराज खान पठाण, किसनराव मोरे, निळकंठ वायाळ, बबनराव गणगे, विष्णूपंत चव्हाळ, आण्णासाहेब खंदारे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com