esakal | Bird Flu: बीडमधील शिरापुरात ४३६ कोंबड्या दगावल्या, पथकाला आढळली एकच कोंबडी
sakal

बोलून बातमी शोधा

Birds Flu

शिरापूर (ता.आष्टी) येथे गेल्या चार दिवसांत सात शेतकऱ्यांच्या तब्बल ४३६ कोंबड्या मृत झाल्याची माहिती प्रशासनाला मिळताच खळबळ उडाली.

Bird Flu: बीडमधील शिरापुरात ४३६ कोंबड्या दगावल्या, पथकाला आढळली एकच कोंबडी

sakal_logo
By
निसार शेख

कडा (जि.बीड) : मुगगाव (ता. पाटोदा) येथे बर्ड फ्लूमुळे अकरा कावळ्यांचा मृत्यू, ब्रह्मगाव (ता. आष्टी) येथे दोन कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर शिरापूर (ता.आष्टी) येथे गेल्या चार दिवसांत सात शेतकऱ्यांच्या तब्बल ४३६ कोंबड्या मृत झाल्याची माहिती प्रशासनाला मिळताच खळबळ उडाली. पशुसंवर्धन, महसूल विभागाचे पथक बुधवारी (ता.१३) या गावांत दाखल झाले. त्यांना फक्त मृत एकच कोंबडी मिळाली.


शिरापूर येथील बाबासाहेब चव्हाण यांच्या मालकीच्या १५०, किरण तागड यांच्या २५, भाऊसाहेब चव्हाण यांच्या ५०, मारुती झांबरे यांच्या ६०, काकासाहेब तागड यांच्या ४१, पोपट तागड यांच्या ६०, संतोष तागड यांच्या ५० अशा एकूण ४३६ कोंबड्या दहा ते तेरा जानेवारीदरम्यान मृत झाल्याची माहिती संबंधितांनी पाहणीसाठी आलेल्या पथकाला तोंडी दिली. ४३६ पैकी ४३५ मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावल्याचेही सांगितले. आज मृतावस्थेत आढळलेल्या एका कोंबडीचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मंगेश ढेरे यांनी दिली.


शिरापूर येथील शेतकऱ्यांच्या काही कोंबड्या मृत झाल्याची माहिती मिळताच पथकाने पाहणी केली. पथकाला एकच कोंबडी मृतावस्थेत आढळली. नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले असून अहवाल मिळाल्यानंतर कारण स्पष्ट होईल.
- मंगेश ढेरे, पशुसंवर्धन अधिकारी, आष्टी

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

Edited - Ganesh Pitekar

loading image