esakal | औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात चारशे रुग्णांचे जमिनीवर उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात चारशे रुग्णांचे जमिनीवर उपचार

sakal_logo
By
योगेश पायघन

औरंगाबाद - कोणतेही रुग्णालय सुरू करण्यासाठी तेथील खाटा आणि त्यानुसार मनुष्यबळाचे प्रमाण ठरलेले असते. मात्र, या सगळ्यांकडे दुर्लक्ष झाल्याने घाटीतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. रोज भरती होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या अन्‌ उपलब्ध खाटांचा मेळ बसत नसल्याने चारशेहून अधिक रुग्णांना घाटी रुग्णालयात "फ्लोअरबेड' उपचार घ्यावे लागत आहे. घाटीतल्या उपचारावर विश्‍वास असल्याने मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भातून रुग्ण आशेने येतात. कोलमडेल्या व्यवस्थेचा डॉक्‍टर, परिचारिकांसह कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त करत गैरसुविधा विसरून उपचार घेत आहेत.

घाटी रुग्णालयात सध्या 1,177 खाटांची मंजुरी आहे. मात्र, 1500 ते 1600 रुग्ण एकावेळी उपचार घेत असतात. निकषांनुसार, तीन रुग्णांमागे एक परिचारिका असणे अपेक्षित असताना सध्या दुप्पट रुग्णांना एकाच परिचारिकेला सेवा द्यावी लागत आहे. शिवाय परिचारिकांच्या 155 तर कर्मचाऱ्यांच्या 266 रिक्त पदांमुळे रुग्णसेवा कोलमडल्याचे चित्र आहे.

तीस वॉर्डांसह विविध आयसीयूत अपूर्ण कर्मचारी संख्या असताना रुग्ण भरतीच्या दिवशी दुप्पट ते तिप्पट रुग्ण भरती होतात. खाटा मिळाल्या नाही तरी रुग्ण जमिनीवर गाद्या आंथरून घेतात. शिवाय गाद्या संपल्यावर बेडशिटवरही काम भागवतात. यातून अनेकदा वाद उद्भवतात. शिवाय या गोंधळात डॉक्‍टरांनाही काम करणे अवघड बनत आहे. त्यामुळे भरती होणाऱ्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत आवश्‍यक मनुष्यबळ मिळणे गरजेचे असल्याची मागणी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, कर्मचारी संघटनांकडून होत आहे. 

रुग्णांची गैरसोय 
-गाद्या, बेडशीटचा सहारा 
-घाटी रुग्णालय 1,177 खाटांचे 
-दररोज भरती रुग्ण पंधराशेवर 
-औषधी, सामग्रीचा तुटवडा 
-155 परिचारिका, 266 चतुर्थश्रेणी पदे रिक्त 
-दररोज भरती होतात दीडशेहून अधिक रुग्ण 
-ओपीडी दोन ते अडीच हजार 
-40 ते 60 प्रसूती 
-15 ते 20 सिझेरियन 
-20 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया

-अडीच हजारांपेक्षा अधिक तपासण्या

 

कर्मचारी, परिचारिका यांची संख्या वाढली पाहिजे, क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात, त्यांना आम्ही बाहेर रेफर करू शकत नाही. त्यामुळे फ्लोअरबेडची व्यवस्था करून उपचार केला जातो. 

- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी 

loading image
go to top