दुसऱ्या दिवशी उचलला सव्वाचारशे टन कचरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

औरंगाबाद - महापालिका आयुक्त रुजू होताच प्रशासन कामाला लागले असून, शुक्रवारी (ता.१८) ३२० टन कचरा उचलल्यानंतर शनिवारी (ता. १९) आणखी सव्वाचारशे टन कचरा शहराबाहेर नेण्यात आला. चिकलठाणा परिसरात शुक्रवारी कचऱ्याला विरोध झाला होता; मात्र या ठिकाणी स्क्रीनिंग मशीन लावले असून, रविवारपासून येथे कचरा टाकण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

शहरातील कचराकोंडीला तीन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाचे नियोजनच सुरू आहे. संनियंत्रण समितीने शहरातील रस्त्यांवर पडून असलेला कचरा  चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव आणि कांचनवाडी येथे हलविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त रुजू होताच प्रशासन कामाला लागले आहे. मात्र, शुक्रवारी चिकलठाणा येथे नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध केला होता. त्यामुळे आयुक्‍तांना कचऱ्याच्या गाड्यांसह परत यावे लागले होते. असे असले तरी इतर ठिकाणी ३२० टन कचरा टाकण्यात आला. दुसऱ्या दिवशीदेखील सव्वाचारशे टन कचरा उचलण्यात आला. 

हातगाड्या, पार्किंगची सोय 
जुना बाजार व देना बॅंकेजवळील कचरा शनिवारी उचलण्यात आला. याठिकाणी पुन्हा कचरा पडू नये म्हणून, हातगाडी चालकांना या ठिकाणी थांबण्याची सोय महापालिकेने करून दिली आहे. तसेच पाणचक्की रोडवर कचऱ्याचा ढीग संपल्याने मोकळ्या झालेल्या जागेवर बस पार्किंगची सोय करून देण्यात आली आहे.

Web Title: four hundred tonnes of garbage picked up in aurangabad