प्रमुख चार पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

भोकरदन, (जि. जालना) - अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. सात) भोकरदन तहसील कार्यालयामध्ये भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले. विशेष म्हणजे अर्ज मागे घेण्याचा दिवस असूनही तहसील कार्यालयावर साधा पोलिस बंदोबस्तही नव्हता. 

भोकरदन, (जि. जालना) - अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. सात) भोकरदन तहसील कार्यालयामध्ये भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले. विशेष म्हणजे अर्ज मागे घेण्याचा दिवस असूनही तहसील कार्यालयावर साधा पोलिस बंदोबस्तही नव्हता. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. सात) तहसील कार्यालयात सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांची गर्दी होती. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हा वाद झाला. त्यानंतर कॉंग्रेसचे काही कार्यकर्तेही आपसांत भिडले नि गोंधळात भर पडली. इतर पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही एकमेकांना धक्काबुक्की करण्यास सुरवात केली. 

पाहता-पाहता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरच हाणामारीला सुरवात झाली. हा गोंधळ तब्बल दोन तास सुरू होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्‍चंद्र गवळी यांनी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया काही काळ थांबविली. विशेष बाब म्हणजे येथे पोलिसांचा बंदोबस्त नसल्याने गोंधळ अधिक वाढला. या गोंधळाची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गवळी यांनी पोलिसांना दिल्यानंतर दोन पोलिस निरीक्षक आणि सहा पोलिस कर्मचारी तहसील कार्यालयावर दाखल झाले. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. 

प्रशासनाचे ढिसाळ नियोजन 
तालुक्‍यातील महत्त्वाच्या निवडणुका होत असताना निवडणूक विभागाचे नियोजन मात्र ढिसाळ होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते आतापर्यंत कोणत्याही प्रकियेत नियोजन नसल्यानेच मंगळवारी गोंधळ झाल्याची चर्चा आहे. 

खुर्ची, इन्व्हर्टरची तोडफोड 
गोंधळ घालणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी सभागृहातील खुर्ची, तसेच इन्व्हर्टरची तोडफोड केली. यादरम्यान शॉर्टसर्किट झाल्याने इन्व्हर्टरला आग लागल्याने एकच पळापळ झाली. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान ज्या लोकांनी गोंधळ घातला त्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ते पाहून या गोंधळात कोण-कोण सहभागी आहे, यामागे कोणाचा हात आहे, हे तपासून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत. 
हरिश्‍चंद्र गवळी, निवडणूक निर्णय अधिकारी 

मंगळवारच्या निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिस बंदोबस्ताचे कुठलेही पत्र निवडणूक विभागाकडून पोलिसांना मिळाले नाही. तसे पत्र मिळाले असते तर निश्‍चितच बंदोबस्त ठेवण्यात आला असता. निवडणूक अधिकाऱ्यांचा भ्रमणध्वनी आला त्या वेळी तत्काळ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले. 
- गोकूळसिंग बुंदेले, प्रभारी पोलिस निरीक्षक, भोकरदन 

Web Title: four major political parties activists