तरुण शेतकऱ्याच्या अवयवांनी चौघांना जिवदान 

तरुण शेतकऱ्याच्या अवयवांनी चौघांना जिवदान 

औरंगाबाद - तरुण शेतकऱ्याला अपघाताने गाठले आणि गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूचे कार्य थांबल्याचे (ब्रेनडेड) डॉक्‍टरांनी सांगताच त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला. या स्थितीतही तिने धीर एकवटून आपल्या मुलाचे अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. घाटी रुग्णालयातील डॉक्‍टरांनी पुढील प्रक्रिया पार पाडल्या. हृदय, यकृताचे मुंबईतील रुग्णांवर, तर दोन्ही किडन्या, डोळ्यांचे औरंगाबादमधील रुग्णांवर प्रत्यारोपण झालेही. तरुण अन्नदात्या शेतकऱ्याच्या अवयवदानातून चौघांना जगण्याचे बळ तर दोघांना दृष्टी मिळाली. 

मिलिंद मनोहरराव हेलवाडे (वय 30, रा. पालपाथरी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) असे अवयवदात्याचे नाव आहे. तो शेतकरी आहे. सिल्लोड मार्गावर 19 फेब्रुवारीला सायंकाळी झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) त्याला दाखल करण्यात आले. तो उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. काही कालावधीनंतर मिलिंदचा मेंदू निकामी झाल्याची माहिती डॉ. सुरेश हरबडे यांनी त्याच्या कुटुंबीयांना दिली. रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मिलिंदच्या कुटुंबीयांचे अवयवदानासंदर्भात समुपदेशन केले. आई पुष्पाबाई, भाऊ शरद यांनी मिलिंदचे अवयवदान करण्याचा निर्णय लगेचच घेतला. डॉक्‍टरांनी या संदर्भात झोनल ट्रान्स्प्लांट को-ऑर्डिनेशन सेंटरला (झेडटीसीसी) कळविले. दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. 20) दुपारी एक व सायंकाळी सातला अवयवदानापूर्वी सोनोग्राफी, रक्‍त व लघवी तपासणी, छातीचा एक्‍स-रे, ईसीजी आणि रक्‍तदाब तपासण्यात आला. तपासण्यांचा अहवाल अवयवदानास योग्य असल्याचे समजताच समितीतील डॉ. जीवन राजपूत, डॉ. मकरंद काळंजकर, डॉ. प्रभाकर जिरवणकर, डॉ. सुहास जेवळीकर, डॉ. सुधीर चौधरी यांनी मिलिंदच्या मेंदूचे कार्य थांबल्याची घोषणा केली. 

"झेडटीसीसी'च्या प्रतीक्षा यादीनुसार हृदय मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात, तर यकृत ग्लोबल हॉस्पिटलला देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार मंगळवारी (ता. 21) अवयव काढल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास हृदय, यकृत एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आले. एक किडनी कमलनयन बजाज रुग्णालयात, तर दुसरी किडनी महात्मा गांधी मिशन रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आली. दोन्ही डोळे "घाटी'तील गरजूंसाठीच ठेवण्यात आले. मुंबई व औरंगाबादमध्ये व या सर्व अवयवांचे आजच यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले, अशी माहिती "घाटी'चे अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी यांनी दिली. 

"घाटी'तील दुसरे अवयवदान 
यापूर्वी "घाटी' रुग्णालयात 26 फेब्रुवारी 2016ला अवयवदान झाले होते. त्यानंतर वर्षभरानंतर आज मिलिंदच्या रूपाने दुसऱ्या अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणारे "घाटी' हे पहिले शासकीय रुग्णालय ठरले. त्याशिवाय नांदेड येथील शासकीय रुग्णालयातही सप्टेंबर 2016मध्ये एका आठवड्याच्या अंतराने अवयवदानाच्या दोन प्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. अवयवदानानंतर अवयव प्रत्यारोपणाची व्यवस्थाही मराठवाड्यातील शासकीय रुग्णालयांत सुरू व्हावी, अशी 
अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

या डॉक्‍टरांचे प्रयत्न... 
डॉ. सुधीर चौधरी यांच्यासह अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, डॉ. अजित दामले, डॉ. सरोजिनी जाधव, डॉ. तुषार पाटील, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. अखिल पाटील, डॉ. कैलास चिंतले, डॉ. चंडालिया, डॉ. प्रमोद अपसिंगेकर यांनी या प्रक्रियेसाठी प्रयत्न केले. सामाजिक कार्यकर्ते नारायण कानकाटे, किशोर वाघमारे, के. के. भाई आणि अखिल अहेमद यांनी मिलिंदवर अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदत केली. 

विमानतळापर्यंतचा प्रवास 
अवयवदानासाठी चिकलठाणा विमानतळ नियमित वेळेपेक्षा एक तास आधी सुरू करण्यात आले. सकाळी अकराला मुंबईहून एक एअर ऍम्ब्युलन्स विमानतळावर आली. ऍम्ब्युलन्स व्हीआयपी गेटने थेट धावपट्टीवर नेण्यात आली. यासाठी "सीआयएसएफ'चे डेप्युटी चीफ आलोक सिंग, सुधीर जगदाळे, प्रभारी विमानतळ निदेशक शरद येवले, टर्मिनल मॅनेजर प्रशांत गोसावी, मोहिनी शंकर, सी. चंद्रशेखर, एटीसी, सीएनएस आणि फायर अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. 
पायलट बालाजी पडगिलवार आणि संदीप जमधडे यांनी "घाटी'पासून अवघ्या बारा मिनिटांत हृदय, यकृत विमानतळापर्यंत पोचविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com