उस्मानाबाद : उमरगा येथे भीषण अपघात, चार ठार

अविनाश काळे
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

तुळजाभवानी मातेचे दर्शन करून चारचाकीने गावाकडे परतणाऱ्या कर्नाटकातील रहिवाशी असलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले.

उमरगा (जि. उस्मानाबाद) - तुळजाभवानी मातेचे दर्शन करून चारचाकीने गावाकडे परतणाऱ्या कर्नाटकातील रहिवाशी असलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले.

गुरुवारी (ता. तीन) रात्री साडेबारानंतर उमरग्यातील आदर्श महाविद्यालयाजवळील साई कॉलनीसमोर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. खासगी लक्झरी बसने कारला समोरून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

याबाबतची माहिती अशी की, कर्नाटकातील धनाजी श्रीहरी बिरादार (वय ३०, रा. मुदल ता. औराद), उमाकांत तानाजी व्हरांडे (वय३०, रा. तलबाल ( एम ) ता.भालकी), दिपक चंद्रकांत अगसगिरे (वय ३१, रा. दुपत महागाव ता. औराद), चंद्रकांत केरबारी बिरादार (वय ५८, रा. हिप्पळगाव ता. औराद),सतीश संगप्पा निदोडे (वय ३२, रा. दुपत महागाव ता. औराद) हे पाच जण तूळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन करून हैद्राबादच्या दिशेने स्विफ्ट कारने (टीएस 07 ईके 5939) परतत असताना उमरगा शहराजवळ हैद्राबादहुन मुंबईकडे निघालेल्या खाजगी लक्झरी बसने (केए 01 एसी 3550 ) समोरून कारला जोरदार धडक दिली.

अपघात झाल्यानंतर मोठा आवाज आल्याने रात्रीच्या वेळी पवन जाधव व अंतुबळी सांस्कृतिक सभागृहात सुरू असलेल्या अन्नछत्रातील तरुण घटनास्थळी धावत गेले. पाचही जण कारमध्ये दबले गेले होते, कांही वेळाने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी व मयत व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. या अपघातात धनाजी बिरादार, उमाकांत व्हरांडे, दिपक अगसगिरे, चंद्रकांत बिरादार या चौघांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या सतीश निदोडे यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात कर्नाटक राज्यातील नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. दुपारपर्यंत मयताच्या शवविच्छेदनाचे काम सुरू होते. दरम्यान आदर्श महाविद्यालयासमोर दुभाजक संपल्यानंतर रस्ता अरुंद आहे, नवख्या चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. या ठिकाणी यापूर्वीही अपघात झालेले असताना महामार्ग प्राधिकरणाकडून सूरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four people killed in Umerga accident