लातूर जिल्ह्यात चार हजार सहाशे खाटा शिल्लक, कोरोनाचा परिणाम झाला कमी

हरी तुगावकर
Monday, 28 December 2020

सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी सध्या जिल्ह्यात कोरोनाच कहर चांगलाच ओसरताना दिसत आहे.

लातूर : सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी सध्या जिल्ह्यात कोरोनाच कहर चांगलाच ओसरताना दिसत आहे. त्यात शनिवारी (ता.२७) सर्वात कमी केवळ १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या चार हजार ६३१ खाटा शिल्लक आहेत. जिल्ह्यात सध्या ३२६ कोरोनाचे रुग्ण असून या पैकी १६३ रुग्ण घरी तर १६३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे.

 

 

त्यात डिसेंबर महिन्यात तर ही संख्या लक्षणीय कमी झाली आहे. दररोज तीस ते चाळीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. त्यात तर शनिवारी तर आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा समोर आला. जिल्ह्यात केवळ १८ जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २२ हजार ८५९ इतकी झाली आहे.

 

 

 

 

काही महिन्यापूर्वी शासकीय खाटा मिळवण्यासाठी रुग्णांना धडपड करावी लागत होती. खाटा उपलब्ध होत नव्हत्या म्हणून खासगी रुग्णालयाची पायरी रुग्णांना चढावी लागत होती. पण आता कोरोनाचा कहर ओसरला आहे. जिल्ह्यात केवळ ३२३ रुग्णच आहेत. यात १६३ रुग्ण हे घरी तर १६३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्‌हयात शासकीय व खासगी रुग्णालयातील खाटांची संख्या चार हजार ८६१ आहे. या पैकी चार हजार ६३१ खाटा या शिल्लक आहेत. ही समाधानाची बाब आहे.

 

 

 

शहराचे बरे होण्याचे प्रमाण ९६.३२ टक्के
जिल्ह्याचे रुग्णाचे बरे होण्याचे प्रमाण ९५.१४ टक्के इतके आहे. तर तेच लातूर शहराचे प्रमाणे ९६.३२ टक्के आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८५३ कोरोना बाधित रूग्‍ण संख्‍या झाली आहे. त्‍यापैकी ८ हजार ५२८ रूग्‍ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच मयत रुग्ण २०५ आहे. मयत व्‍यक्‍ती पैकी वय वर्ष ५० च्‍या पुढील रूग्‍ण संख्‍या १६९ इतकी आहे. एकूण मयत रुग्णांपैकी ५५ स्त्री व १५० पुरुष आहेत. सध्या ११९ अॅक्‍टीव्ह रूग्‍ण संख्‍या आहे. शहराचा कोरोनाचा मृत्यूदर २.३१ आहे.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Thousand Beds Remain, Corona Infection Decrease Latur News