fourth class girl Teacher molestation crime
fourth class girl Teacher molestation crimesakal

चौथीच्या विद्यार्थिनीची छेड; शिक्षकावर विनयभंग, पोक्सोनुसार गुन्हा

बीडमधील इंग्रजी शाळेतील घटना; शिक्षकास पालकांकडून चोप

बीड : शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीतील एका इंग्लिश स्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची शाळेतीलच शिक्षकाने छेड काढल्याची घटना शुक्रवारी (ता. आठ) घडली. यामुळे संतप्त पालकांनी शनिवारी (ता. नऊ) शाळेत जाऊन शिक्षकास बेदम चोप दिला. शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतल्यानंतर पालक शांत झाले. याप्रकरणी शिक्षकावर विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला. शाहेदखान कासम पठाण (वय ३३, रा. नायगाव ता. पाटोदा) असे त्या गुन्हा नोंद झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : पीडित १० वर्षीय विद्यार्थीनी शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिक्षण घेते. शुक्रवारी (ता. आठ) सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी मधल्या सुटीनंतर शाहेदखान पठाण हा अध्यापनासाठी वर्गात आला. यावेळी बाकड्यावर बसलेल्या पीडितेचा त्याने विनयभंग केला. वर्ग संपल्यावर बाहेर पडताना शिक्षक शाहेदखान याने पीडितेला कोणाला काहीही सांगू नकाे, असे बजावले. शनिवारी सकाळी ११ वाजता पीडितेच्या संतप्त नातेवाईकांनी शाळेत जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला.

त्यानंतर शिक्षक शाहेद खान यास लाथाबुक्क्यांनी चोप दिला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी शिवाजीनगर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस निरीक्षक केतन राठोड यांच्यासह शिवाजी नगर पोलिसांनीी धाव घेत नातेवाईकांना शांत केले. त्यानंतर पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन शाहेदखान पठाणविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पिंक पथकाच्या प्रमुख उपनिरीक्षक मीना तुपे करत आहेत.

दरम्यान, घटनेनंतर आरोपी शाहेदखान पठाण याचे नातेवाईकही शाळेत पोहोचले. त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याला अटक कधी करणार, हे अद्याप स्पष्ट नाही.

शाळा व्यवस्थापना विरुद्धही रोष

शिक्षकानेच विद्यार्थीनी सोबत गैरवर्तन केल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. शाळा व्यवस्थानाला जाब विचारला तेव्हा सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली गेल्याचा आरोप पालकांनी केला. या प्रकारामुळे विद्यार्थीनींच्या शाळेतील सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com