नोकरीच्या आमिषातून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेला फाटा देत पैसे घेऊन नोकऱ्या लावण्याचे ‘कुटिल उद्योग’ सर्रास सुरू आहेत. अशाच एका प्रकरणात एका जणाला शिक्षकपदी नोकरीचे आमिष दाखवून अठरा लाखांत नोकरीचा व्यवहार केला. त्यानंतर सहा लाख साठ हजार रुपये घेऊन फसवणूक केली.

औरंगाबाद - शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेला फाटा देत पैसे घेऊन नोकऱ्या लावण्याचे ‘कुटिल उद्योग’ सर्रास सुरू आहेत. अशाच एका प्रकरणात एका जणाला शिक्षकपदी नोकरीचे आमिष दाखवून अठरा लाखांत नोकरीचा व्यवहार केला. त्यानंतर सहा लाख साठ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. यात शैक्षणिक संस्थेचा प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याध्यापकाविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. सहा) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, डॉ. रतन आसाराम वाघ असे संशयिताचे नाव आहे. तो नूतन बहुउद्देशीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक व संस्थेचा प्रशासकीय अधिकारी आहे. याबाबत गजानन भागाजी वाबळे (रा. बोरळवाडी, ता. जि. हिंगोली, ह. मु. पिसादेवीरोड हर्सूल)

यांनी तक्रार दिली. त्यांचे एम. ए. बी. एड.चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नोकरीच्या शोधात होते. वाबळे यांनी ओळखीतील डॉ. संजय गव्हाणे यांना नोकरीबाबत विचारणा केली. त्यानंतर गव्हाणे वाबळे यांना २०१६ मध्ये नूतन बहुउद्देशीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हडको एन-११ येथे घेऊन गेले. तेथे रतन वाघ याच्याशी त्यांची भेट घालून दिली. त्यावेळी राज्यशास्त्र विषयात सहशिक्षकपदी जागा आहे. त्यासाठी अठरा लाख मोजावे लागतील. नोकरीला न लावल्यास दुप्पट पैसे देईल, असे आश्‍वासन वाघने वाबळे यांना दिले. तसेच अनुदानाबाबतचे शिफारस पत्रही दखविले. यावर विश्‍वास ठेवून वाबळे यांनी वाघशी व्यवहार केला. त्यात २५ एप्रिल २०१६ ला वाबळे व त्यांच्या परिचितासमोर चार लाख व नंतर सहा लाख रुपये दिले. त्यानंतर वाबळे यांना वाघ याने एक वर्षापूर्वीची तारीख असलेले व विशिष्ट कालावधीचे तात्पुरते नियुक्तिपत्र दिले. तसेच ॲप्रूव्हल काढून देतो असे सांगितले; पण पाठपुरावा करूनही त्यांनी ॲप्रूव्हल काढून दिले नाही. 

आश्‍वासनांची खैरात
ॲप्रूव्हल न मिळाल्याने वाबळे संस्था अध्यक्षाला भेटले; पण महाविद्यालयात रिक्त जागा नसल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याने त्यांनी वाघकडे पैशांची मागणी केली; पण तो आश्‍वासने देत राहिला. नंतर धनादेशही दिले; पण ते बॅंकेत वटले नाहीत. त्यानंतर रोख चाळीस हजार व धनादेश स्वरूपातून तीन लाख रुपये वाघने दिले. उर्वरित सहा लाख साठ हजार रुपये न दिल्याने त्याच्याविरुद्ध वाबळे यांनी सिडको ठाण्यात तक्रार दिली. तपास प्रवीण पाटील करीत आहेत.  

Web Title: Fraud case in Aurangabad due to Job offer