मोबाईल टॉवरच्या नावाखाली पाच लाखाचा गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल 

प्रल्हाद कांबळे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

आमिषापोटी मिर्झा यांनी चार लाख ९० हजार ५२० रुपये जमा केले. मात्र घरावर काही टॉवर उभा राहिला नाही. संबंधितांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा पूर्ण पत्ता नसल्याने व आता फोनसुध्दा करीत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

नांदेड :  घरावर मोबाईल टॉवर बसविण्याचे आमिष दाखवून एकाला पाच लाखाचा गंडा घालणाऱ्या सहा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहराच्या आसरानगर भागात राहणारा मिर्झा अजमत बेग समीउल्ला बेग (वय ४२) हे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. त्यांना आपल्या घरावर रिलायन्स ४ जी टॉवर व्हीजन कंपनीचे बसविण्याचे आमिष दाखवलि. यावेळी कौशीक, राजकुमार, लोकेश, विकास, कार्तीक महाजन आणि फुलचंद या सहा जणांनी त्यांना विश्वासात घेतले. आम्ही रिलायन्स कंपनीचे टॉवर बसविण्याचे काम करतो. असे सांगुन मिर्झा अमजत यांच्याकडून पाच जून ते १० जूलै २०१८ या काळात एसबीआय, पंजाब नॅशनल, कॅनरा आणि ॲक्सीस या बँकाचे खाते क्रमांक देऊन वेळोवेळी खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. आमिषापोटी मिर्झा यांनी चार लाख ९० हजार ५२० रुपये जमा केले. मात्र घरावर काही टॉवर उभा राहिला नाही. संबंधितांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा पूर्ण पत्ता नसल्याने व आता फोनसुध्दा करीत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी वजिराबाद ठाण्यात धाव घेतली. मिर्झा अजमत यांच्या फिर्यादीवरुन वरील सहा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलिस निरीक्षक प्रभा पुंडगे या करीत आहेत.

'नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. एकेरी नावाचा वापर करून फोनवर बाेलणाऱ्यांशी संबंध न ठेवता आपली सर्व माहिती त्यांला देऊ नये. अनेक वेळा मी बँकेतून, किंवा एखाद्या फायनान्स कंपनीतून बोलते असे सांगुन तुम्हाला बक्षिस लागले आहे, इतके पैसे जमा करा असे म्हणून आपली फसवणूक करतो. त्यासाठी सतर्कता बाळगणे चांगली सवय असल्याचे' पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी सांगितले.  

 

Web Title: Fraud of five lakhs money in the name of mobile tower