दाखवला टिप्पर अन् निघाला ट्रॅक्टर !

fraud in Purchasing JCB and tractor
fraud in Purchasing JCB and tractor

लातूर : जेसीबी अन् टिप्पर अशी मोठी वाहने असल्याची बनावट कागदपत्र दाखवून त्यावर लाखो रूपयाचे कर्ज उचलले. कर्ज दिल्यानंतर जेसीबी आणि टिप्परच्या क्रमांकाचे ट्रॅक्टर असल्याचे आढळून आले. अशा एक ना अनेक प्रकारातून वाहनांची बनावट कागदपत्र दाखवून 75 लाख रूपयाचे वाहन कर्ज घेऊन श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी मुरूड (ता. लातूर) येथील नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे बनावट कागदपत्र तयार करून कंपनीला गंडा घालणारी एक टोळीच कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

पोलिसांनी सांगितले, की मुरूड येथील नऊ जणांनी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीला वाहनांची बनावट कागदपत्र दाखवून कर्जाची मागणी केली. वाहनांच्या नोंदणीसह (आरसी बुक) विमा पॉलिसी व अन्य कागदपत्रही बनावट तयार केली. कर्जाचा प्रस्ताव आल्यानंतर कंपनीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्याने तपासणी केली असता त्याला बनावट क्रमांकाची वाहने दाखवण्यात आली. त्यावरून कंपनीने लाखो रूपये कर्जाचे वाटप केले. कंपनीला संशय आल्याने कर्ज दिलेल्या वाहनांची आरटीओ कार्यालयात चौकशी केली. यात मुरूड येथील अविनाश शिवाजीराव भांगिरे, व्यंकट माधव सुरवसे, समाधान माधव शितोळे, यासीन फरीद शेख, यामीनी काशीनाथ सोमासे, गणेश अण्णासाहेब कणसे, प्रमोद भीमराव शिंगारे, अशिकांत राजेंद्र गायकवाड आणि रेहाना बाबुलाल पठाण यांनी वाहनांची बनावट कागदपत्र देऊन कंपनीची फसवणुक केल्याचे उघड झाले. 

सर्वांनी दाखवलेल्या मोठ्या वाहनांचे क्रमांक ट्रॅक्टरचे असल्याचे आढळून आले. सर्वांना कंपनीने 75 लाख पन्नास हजार रूपयाचे कर्ज वाटप केले होते. कर्जासाठी बनावट कागदपत्र देऊन फसवणुक केल्याचे उघड झाल्यानंतर कंपनीचे अधिकारी रामराजे जगदाळे यांनी मुरूड पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी नऊ जणांविरूद्ध फसवणुकीसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक टी. आर. भालेराव पुढील तपास करत आहेत. दरम्यान हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे भालेराव यांनी सांगितले.  

मोठ्या कर्जाच्या आमिषाचे बळी

एका व्यक्तीने केवळ पॅनकार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स घेऊन विशिष्ट टक्केवारीच्या मोबादल्यात मोठे कर्ज देण्याचे आमिष दाखवून मुरूडमध्ये अनेकांना कर्जाचा लाभ मिळवून दिल्याची चर्चा मध्यंत्तरी घडून आली. त्या व्यक्तीला सोलापूर जिल्ह्यात पोलिसांनी अशाच एका प्रकरणात अटक केल्यानंतर या सोलापूरच्या पोलिसांनीही मध्यंत्तरी मुरूड येथे येऊन चौकशी केली होती. त्यानंतर याच पद्धतीने कर्ज घेतलेल्या काही व्यक्तींनी त्याचा भरणा करून कारवाईतून सुटका करून घेतली आणि कर्जाची परतफेड न करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. अनेकांनी ऐपत नसताना मोठे कर्ज घेतले. मोठ्या कर्जाच्या आमिषाचे ते बळी ठरल्याचीही चर्चा सध्या होत असली तरी या प्रकरणात कंपनीच्या अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा संशय बळावत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com